मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण की नोटिसांचा पाऊस?
किशाेरी पेडणेकर यांचे उपाययाेजनांवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामस्थळांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ऑक्टोबरमध्ये विविध बांधकामस्थळांना तब्बल २७० कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, तर २९ बांधकामांना काम बंद नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा आणि काम बंदीच्या आदेशांनंतर मुंबईतील प्रदूषणावर प्रत्यक्ष किती नियंत्रण मिळाले, असा सवाल पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुंबईतील बांधकाम प्रकल्पांतून उडणारी धूळ, बांधकाम साहित्याची वाहतूक, रस्त्यांवरील धूलिकण आणि वाहनांचे उत्सर्जन यांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामस्थळांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे; मात्र पालिका नोटिसा देण्यापलीकडे ठोस कारवाई करीत नसल्याचे विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी म्हटले आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावणे म्हणजे संबंधित बांधकामस्थळाला नियमभंगाबाबत स्पष्टीकरण मागणे; तर काम बंद नोटीस ही काम थांबवण्याच्या निर्देशाशी संबंधित कारवाई आहे. या दोन्ही कारवायांचे स्वरूप वेगवेगळे असल्याने त्यांची स्वतंत्र नोंद आणि पुढील कार्यवाही महत्त्वाची ठरते. पालिका कारवाईबाबत टाळाटाळ करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नोटिसा बजावल्यानंतर संबंधित बांधकामस्थळांनी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या का, नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली का आणि काम बंदचे आदेश प्रत्यक्षात पाळले गेले का, हे महत्त्वाचे आहे. केवळ नोटिसांची संख्या जाहीर करण्यापेक्षा त्यानंतर झालेल्या कार्यवाहीचा तपशील समोर आणा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.