रेल्वेचा गोंधळ सुरूच
तीन घटनांनी लोकलचा खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : उपनगरी रेल्वे सेवेतील अडथळ्यांचे सत्र गुरुवारीही सुरूच राहिले. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे-माहीमदरम्यान रुळालगत साचलेल्या कचऱ्याला आग लागली, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर खडकी-इंदूर विशेष एक्स्प्रेसची आपत्कालीन साखळी ओढण्यात आली, तर हार्बर मार्गावर स्वयंचलित इशारा प्रणाली सक्रिय झाल्याने पनवेल लोकल थांबवावी लागली.
एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. विशेषतः गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारांमुळे प्रवाशांना विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला. वांद्रे ते माहीम स्थानकांदरम्यान रेल्वे रुळालगत साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याला आणि सुकलेल्या गवताला गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली. परिस्थिती लक्षात घेऊन मोटरमनने लोकल थांबवली. आग आटोक्यात आल्यावर ८.२४ वाजता लोकल पुन्हा रवाना झाली. या घटनेमुळे अप धीम्या मार्गावरील लोकल सुमारे १० ते १२ मिनिटे विलंबाने धावल्या. सकाळी ९.३० वाजता गाडी क्रमांक ०९३२३ खडकी-इंदूर विशेष एक्स्प्रेसच्या एस-९ शयनयान डब्यात आपत्कालीन साखळी ओढण्यात आली. त्यामुळे गाडी थांबवावी लागली. टिळकनगर ते चेंबूर स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळी स्वयंचलित इशारा प्रणाली (एडब्ल्यूएस) सक्रिय झाल्याने पनवेलकडे जाणारी लोकल थांबवावी लागली. सकाळी १०.२६ वाजता मोटरमनने पेंटोग्राफ खाली करून गाडी थांबवली. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील तीन लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. संबंधित लोकल सुमारे सहा मिनिटे थांबली होती, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.