सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : एमएमआरडीएकडून गायमुख-वडाळा भक्ती पार्कदरम्यान तब्बल ३५ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून, या मार्गिकेसाठी एमएमआरडीए एल अँड टी या कंपनीकडून मेट्रो ट्रेन घेत आहे. त्यानुसार अलस्टोम या कंपनीच्या आंध्र प्रदेशामधील प्रकल्पात सहा डब्यांची अत्याधुनिक ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन तयार झाली आहे. ती रस्ते मार्गाने दिवाळीनंतर मुंबईसाठी रवाना केली जाणार असून, डिसेंबरमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या ‘एमएमआरडीए’च्या प्रयत्नाला वेग येणार आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरांबरोबरच ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीए मेट्रो-४ आणि ४ अ मार्गिका उभारत आहे. ३२ स्थानके असलेली ही मार्गिका चार टप्प्यांत सुरू केली जात असून, टप्पा १ गायमुख-कॅडबरी जंक्शन आणि टप्पा २ कॅडबरी जंक्शन- मुलुंड फायर स्टेशन या दोन टप्प्यांचे ९५ टक्के सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या मेट्रो मार्गिकेसाठी ३९ मेट्रो ट्रेन पुरवण्याचे काम एमएमआरडीएने एल अँड टीला दिले आहे. त्यानुसार एल अँड टी अलस्टोमच्या आंध्र प्रदेशमधील श्रीसीटी येथील प्रकल्पात मेट्रो ट्रेनची बांधणी करीत असून, त्यापैकी पहिली सहा डब्यांची ट्रेन तयार झाली असल्याचे एल अँड टीचे महाव्यवस्थापक आशीष गुप्ता यांनी स्पष्ट करतानाच ही मेट्रो डिसेंबरमध्ये मुंबईत पोहोचणार असल्याचे स्पष्ट केले.
ऑगस्ट २०२७ पर्यंत २० ट्रेन येणार
मेट्रो ४ साठी मेट्रो ट्रेन बनवण्याचे काम अलस्टोमच्या श्रीसिटी प्रकल्पात तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, पहिली ट्रेन लवकरच रवाना केली जाणार आहे. तर ऑगस्ट २०२७ पर्यंत २० मेट्रो ट्रेन तयार करून एमएमआरडीएला सुपूर्द केल्या जातील, असे अलस्टोमचे एमडी चंपक पांडा यांनी सांगितले. तसेच उर्वरित १९ ट्रेन २०२८ च्या सुरुवातीपर्यंत दिल्या जाणार आहेत.
ड्रायव्हरलेस ट्रेन
नव्या ट्रेनमध्ये ड्रायव्हरलेस ऑपरेशनची पूर्ण क्षमता असणार आहे. सिग्नल यंत्रणा आणि ट्रेनमधील उपकरणांमध्ये समन्वय साधून ट्रेनचे ॲक्सिलरेशन, ब्रेकिंग आणि दरवाजे उघडणे-बंद करणे हे सर्व ऑपरेशनल कंट्रोल सेंटरमधून नियंत्रित केले जाईल. या प्रकल्पात रोलिंग स्टॉक आणि सिग्नलिंग यंत्रणा दोन्ही एकाच कंपनीने पुरवल्याने एकात्मीकरण अधिक सोपे झाले आहे.
मेट्राे ट्रेनची वैशिष्ट्ये
- एका ट्रेनमध्ये सहा डबे असणार
- ३१६ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था तर २२८० प्रवाशांना प्रवास करता येईल.
- एका डब्याची लांबी २२ मीटर, रुंदी ३.२२ मीटर
- सायकल उभी करण्यासाठी प्रत्येक डब्यात एक स्टॅण्ड
- दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था
- मोबाईल चार्जिंगसाठी प्रत्येक डब्यात २० यूएसबी चार्जिंग पॉइंट
- प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून डब्यांमधील डिस्प्लेची संख्या वाढवली.
- गाडीच्या समोरील आणि मागील बाजूला आपत्कालीन दरवाजा
- ट्रेनचे ३५ वर्षांचे आयुष्य
मुंबई : सहा डब्यांची अत्याधुनिक ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन तयार झाली असून, ती दिवाळीनंतर मुंबईत येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.