पवित्र पोर्टल भरती
शिक्षकपदासाठी ३ नोव्हेंबरपासून मुलाखती
१०,३२८ पदांसाठी ११,४९३ उमेदवारांची शिफारस
मुंबई, ता. ३१ : राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या १० हजार ३२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांचा समावेश असलेली नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पदनिहाय शिफारशींत इयत्ता पहिली ते पाचवीच्या १,६०९ पदांसाठी ४,४७८, सहावी ते आठवीच्या ४,५०५ पदांसाठी १०,७९२, तर नववी ते दहावीच्या ४,२१४ पदांसाठी ११,८८४ प्राधान्यक्रमांचा समावेश आहे. मुलाखतीसह निवड प्रक्रियेसाठी खासगी शैक्षणिक संस्थांच्या २,४१६ जाहिराती प्राप्त झाल्या होत्या.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही ऑनलाइन परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ दरम्यान झाली होती. परीक्षेसाठी दाेन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दाेन लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. एकूण एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. त्यांना पवित्र पोर्टलवरील लॉगिनमध्ये निवडीची स्थिती पाहता येईल. व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावरील ‘डाउनलोड’ विभागात उपलब्ध आहे. उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
तक्रार निवारणासाठी समिती
लाखतीशिवाय निवड प्रकारातील तक्रारींच्या निवारणासाठी राज्य स्तरावर ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेलवर ७ नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.