मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा एक रुपयाची वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई आणि महानगर प्रदेशातील (एमएमआर) सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ९० रुपये झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी, तर सप्टेंबरपासूनची तिसरी दरवाढ आहे.
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम पश्चिम आशियातील ऊर्जा पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच देशांतर्गत गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, महागड्या आयात गॅसवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचे एमजीएलने सांगितले. या दरवाढीचा मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १२ लाख ९३ हजार सीएनजी वाहनांना फटका बसणार आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांचा समावेश आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरला सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली होती. त्या वेळी दर ८९ रुपये झाला होता. सप्टेंबरमध्येही दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढ केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरवाढीमुळे रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
........
सीएनजीचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे रोजच्या खर्चात भर पडत आहे. आधीच रिक्षाची देखभाल आणि घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. आता इंधनावर अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत; मात्र प्रवाशांकडून लगेच जास्त भाडे घेता येत नाही. त्यामुळे दरवाढीचा भार आम्हालाच सहन करावा लागतो.
- राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना
........
महिन्याला सीएनजीवर किती खर्च होतो, याचा हिशेब ठेवणेही कठीण झाले आहे. सीएनजीचे दर वाढतात; पण रिक्षाचे भाडे वाढत नाही. महागाईमुळे प्रवासीही त्रस्त आहेत. त्यामुळे आमच्या रोजच्या कमाईवर परिणाम होणार आहे. सरकारने रिक्षाचालकांचा विचार करावा. सीएनजीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.