महालक्ष्मी रेसकोर्सवरील बांधकाम थांबवले
वृक्षतोडीच्या नियमांचे उल्लंघन; पालिकेची ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महालक्ष्मी रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्ल्यूआयटीसी) परिसरातील प्रस्तावित बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन करून वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित बांधकाम तातडीने थांबवण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे.
जी-दक्षिण विभागाच्या नामनिर्देशित अधिकाऱ्यांनी २९ ऑक्टोबरला मुंबई महापालिकेन काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षक आणि इमारत प्रस्ताव विभागाने दिलेल्या पत्रांमधील निर्देशांचे पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना २४ तासांच्या आत सक्षम प्राधिकरणाची मंजूर बांधकाम परवानगी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा बांधकाम हटविण्याची तसेच साहित्य आणि यंत्रसामग्री काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरडब्ल्यूआयटीसीला वृक्षतोड आणि पुनर्रोपणासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार १३ वृक्ष तोडणे, १२ वृक्षांचे पुनर्रोपण करणे आणि ४३ वृक्ष जागेवर कायम ठेवणे बंधनकारक होते. ११ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत जागेवर कायम ठेवायच्या ४३ वृक्षांपैकी आठ वृक्ष आढळले नाहीत. तसेच पुनर्रोपणासाठी मंजुरी दिलेल्या १२ वृक्षांपैकी दोन वृक्ष जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंजूर परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी ताडदेव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. वृक्ष प्राधिकरणाने एफआयआर दाखल करण्याची मागणी पाेलिसांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
---
केवळ नोटीस देऊन चालणार नाही. संबंधितांवर एफआयआर दाखल करून दोषींना अटक करावी आणि बेकायदा बांधकामावर कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्ही हा लढा आणखी तीव्र करू.
- संतोष दौंडकर, तक्रारदार
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.