लग्नाच्या जेवणातून
२८ जणांना अन्नबाधा
नवदाम्पत्यासह लहान मुलांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : विवाह साेहळ्यादरम्यान जेवणातून २८ जणांना अन्नबाधा झाल्याची घटना साेमवारी उघडकीस आली आहे. बाधितांमध्ये नवदाम्पत्यासह लहान मुलांचाही समावेश आहे. उलट्या, जुलाब, पोटदुखी, चक्कर असा त्रास सुरू झाला. बाधितांना तातडीने मुलुंड येथील म. तु. अग्रवाल महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
नाहूर येथील राजगृह महाबोधी बुद्धविहाराच्या नालंदा हॉलमध्ये रविवारी (ता. १) दुपारी विवाह सोहळा पार पडला. या वेळी ४०० ते ५०० पाहुणे उपस्थित होते. सायंकाळी नवविवाहित दाम्पत्यासह दोन्ही कुटुंबांतील नातेवाइकांनी शेवटच्या पंगतीत जेवण केले असता रात्री ९.३०च्या सुमारास काही जणांना त्रास सुरू झाला.
बाधितांची संख्या वाढू लागल्याने नातेवाइकांची धावपळ उडाली. अनेकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
या घटनेनंतर नवरदेवाच्या नातेवाइकांनी केटरिंग व्यावसायिकावर निष्काळजीचा आरोप केला आहे. रबडी खाल्ल्यानंतरच अनेकांची प्रकृती बिघडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
-----
कलाकंदमुळे बाधा झाल्याचा संशय
विवाह सोहळ्यात शेवटच्या पंगतीपर्यंत गुलाबजामून संपल्याने त्याऐवजी कलाकंद देण्यात आले. पालिकेच्या प्राथमिक निरीक्षणानुसार शेवटच्या पंगतीत कलाकंद खाल्लेल्या वऱ्हाड्यांना त्रास झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पदार्थातून अन्नबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अन्नपदार्थांच्या तपासणीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
-----
‘एफडीए’ने घेतले नमुने
लग्नातील भोजन समारंभातील घटनेची अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी दोन ते तीन ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. यासाठी कच्च्या मालाचे नमुने गाेळा केले जात आहेत. तसेच हा कच्चा माल कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठादार कोण होता, याचीही माहिती प्रशासन घेत आहे. लग्नातील जेवण संपल्याने तयार पदार्थांचे नमुने घेता आलेले नाहीत. या तपासणीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.