दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांवर नजर
पश्चिम रेल्वेचे ‘ऑपरेशन दीप’; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम, टीसींना बॉडी कॅमेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असताना विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन दीप’अंतर्गत मुंबई विभागातील स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत विनातिकीट प्रवास करणारे, आरक्षित डब्यांत अनधिकृत प्रवेश करणारे तसेच चुकीच्या श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी तपासणी पथकांच्या रडारवर असतील.
सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या गर्दीमुळे तिकीट तपासणीचे आव्हानही वाढते. विनातिकीट प्रवासामुळे वैध तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नाचेही नुकसान होते. हे प्रकार रोखण्यासाठी स्थानकांवरील नियमित तपासणीसह अचानक तपासणी, सापळा कारवाई आणि विशेष पथकांच्या माध्यमातून रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी केली जाणार आहे.
चार टप्प्यांत कारवाई
‘ऑपरेशन दीप’मध्ये शोध, तपासणी, नियमांची अंमलबजावणी आणि दंडवसुली अशा चार टप्प्यांवर भर देण्यात आला आहे. ‘डी’ म्हणजे डिटेक्टिव्ह अर्थात विनातिकीट प्रवाशांचा शोध, ‘ई’ म्हणजे एक्झामिन अर्थात तिकिटे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी, दुसरे ‘ई’ म्हणजे इन्फोर्स अर्थात रेल्वे नियमांची अंमलबजावणी, तर ‘पी’ म्हणजे पेनलाइज अर्थात नियमभंग करणाऱ्यांकडून दंडवसुली, अशा स्वरूपात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
तिकीट तपासनीसांवरही कॅमेऱ्यांची नजर
तिकीट तपासणीदरम्यान होणारे वाद टाळणे, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि प्रवाशांशी होणारा संवाद अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रयोग सुरू केला आहे. मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना हे कॅमेरे आणि विशेष काळ्या रंगाची जॅकेट देण्यात आली आहेत. सुरुवातीला १५ बॉडी कॅमेरे आणि ३० जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड, फोर्ट्रेस चेक आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमांसह विविध पद्धतींचा वापर केला जात आहे. मेल, एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्येही ही कारवाई केली जाणार आहे. रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार विनातिकीट प्रवासासाठी किमान ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट काढावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.