कोलेजन पावडरच्या जाहिरातीवर आक्षेप
एफएसएसएआयची टाटा १एमजी, अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘कोलेजन पावडर’ या आरोग्यपूरक उत्पादनाच्या जाहिराती आणि लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) चार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये टाटा १एमजी हेल्थकेअर सोल्युशन्स, उत्पादक एसीएफओ फार्मास्युटिकल्स (इंडिया) लिमिटेड, अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस आणि फ्लिपकार्ट इंडिया यांचा समावेश आहे.
नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. या उत्पादनाच्या जाहिरातीत त्वचा उजळण्यास आणि चमकदार दिसण्यास मदत होत असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच १२ आठवड्यांत त्वचेत १५, २३ आणि १४ टक्के सुधारणा होत असल्याचेही नमूद केले होते, मात्र या दाव्यांना पुरेसा वैज्ञानिक आधार किंवा विश्वासार्ह पुरावे नसल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
......
उत्पादक कंपनीलाही कारणे दाखवा
उत्पादनाच्या पाकिटावर ‘औषधी वापरासाठी नाही’ ही सूचना ठळकपणे दिलेली नसल्याचा आक्षेप प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच ‘न्यूट्रास्युटिकल’ हा उत्पादनाचा प्रकार दर्शवणारा शब्दही आवश्यक आकारात आणि योग्य ठिकाणी छापलेला नसल्याचे निदर्शनास आले. उत्पादनात अनेक घटक असतानाही त्याला ‘प्युअर कोलेजन’ असे संबोधण्यात आले. प्रतिस्पर्धी उत्पादनांशी तुलना करणारे दावे तसेच त्वचा, केस, नखे आणि सांध्यांसाठी फायदेशीर असल्याचे दावेही पुराव्याविना केल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. उत्पादनाच्या चवीबाबतही परस्परविरोधी माहिती देण्यात आली आहे. एका ठिकाणी ‘ऑरेंज फ्लेवर’, तर दुसऱ्या ठिकाणी ‘फ्लेवरलेस’ किंवा ‘अनफ्लेवरड’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
....
ऑनलाइन विक्री मंचही तपासणीच्या कक्षेत
या उत्पादनाच्या ऑनलाइन जाहिराती आणि विक्रीप्रकरणी अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस आणि फ्लिपकार्ट इंडिया यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांसोबतच ई-कॉमर्स मंचांवरील जाहिराती आणि उत्पादनविषयक दाव्यांची जबाबदारीही तपासली जाणार आहे. कंपन्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.