मुंबईतील नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; एफडीएची विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत बृहन्मुंबई विभागातील पाच आस्थापनांची तपासणी करून दोन हजार ३५२ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील नऊ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली.
माटुंगा, घाटकोपर, विक्रोळी, अँटॉप हिल, चेंबूर, साकीनाका आणि लोअर परळ परिसरातील खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या वेळी अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्या. परिसरात अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, कीटकांचा प्रादुर्भाव, कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव आणि स्वच्छतेच्या नोंदी नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. मसाला उत्पादनाच्या ठिकाणी यंत्रसामग्री अस्वच्छ होती. तसेच उघड्या कचराकुंड्या आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. एका आस्थापनेत खाद्यतेलाच्या पुनर्पॅकिंगसाठी जुन्या डब्यांचा वापर होत असल्याचेही उघड झाले.
.....
३५ हजारांचा साठा जप्त
प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातही २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कारवाई करण्यात आली. या मोहिमेत बृहन्मुंबई विभागातील चार आस्थापनांवर कारवाई करून ३५ हजार ६९९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करून चार जणांना अटक करण्यात आली. दोन आस्थापना सीलबंद करण्यात आल्या, तर एक वाहन जप्त करण्यात आले.
.....
कुठे-कुठे कारवाई?
माटुंगा येथील चायना मून, विक्रोळीतील न्यू बिकानेर स्वीट्स, घाटकोपरमधील खुशबू एंटरप्रायझेस आणि कोकोस्बिल्स कॅफे, अँटॉप हिल येथील सागर मिल्क सेंटर, चेंबूरमधील आरती इम्पेक्स, साकीनाका येथील सिंधुदुर्ग मसाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि लोअर परळमधील शिंदे मसाले दळणवाले यांच्यासह अन्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.