दिवाळीत खासगी बसच्या जादा भाडेवसुलीला लगाम
१ ते २० नोव्हेंबरदरम्यान आरटीओची विशेष तपासणी मोहीम; तक्रारींसाठी हेल्पलाइन, बुकिंग कार्यालयांचीही तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, खासगी कंत्राटी बसचालकांकडून होणाऱ्या जादा भाडेवसुलीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने येत्या १ ते २० नोव्हेंबरदरम्यान खासगी प्रवासी बस विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बसमालकांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईसह प्रमुख शहरांतून आपल्या गावी जातात. या गर्दीचा गैरफायदा घेत खासगी बसचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या २७ एप्रिल २०१८च्या निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी बसचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीच्या भाडेदराचा विचार करून खासगी कंत्राटी बसचे संपूर्ण वाहनासाठीचे प्रति किलोमीटर भाडे एसटीच्या दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, अशी मर्यादा घालण्यात आली आहे.
या नियमानुसार प्रत्येक मार्गासाठी बसमालकांना आकारता येणारे कमाल भाडे आणि त्यानुसार प्रतिआसन भाड्याचा तक्ता तयार करून तो बस सुटण्याच्या ठिकाणी प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करावा लागणार आहे. प्रवाशांना अडचणींबाबत तक्रार करता यावी, यासाठी संबंधित आरटीओ कार्यालयाच्या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
केवळ भाडेवसुलीच नव्हे, तर रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तपासणी होणार आहे. विनापरवाना वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अवैध मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, वाहनातील बेकायदा फेरबदल, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेललाइट, वायपर, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन दरवाजा आणि पॅनिक बटण यांची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कर भरला आहे की नाही, याचीही खातरजमा केली जाईल. तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल गुगल शीटमध्ये नोंदविण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.
तिकीट बुकिंगची पडताळणी
तपासणीदरम्यान खासगी बसच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुकिंगची पडताळणी केली जाणार आहे. बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन संगणकीय नोंदी तपासण्यासह प्रवाशांशी संवाद साधून प्रत्यक्ष आकारण्यात आलेल्या भाड्याची खातरजमा केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.