एनसीएमसी कार्ड सक्तीला
३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : एसटीच्या प्रवास सवलतींसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पात्र प्रवाशांना कार्ड नसतानाही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ जानेवारी २०२७ पासून सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्ड अनिवार्य असेल.
राज्य सरकारकडून विविध सामाजिक घटकांना एसटीच्या तिकिटात सवलत दिली जाते. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले होते. नोंदणी आणि वितरणातील तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र प्रवाशांना पूर्ण तिकीटदराने प्रवास करावा लागत होता. विशेषतः ग्रामीण भागातील महिला या प्रक्रियेपासून दूर राहिल्याने त्यांना सवलतीचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या.
महिलांचे कार्ड वितरण कमी
सप्टेंबरपर्यंत राज्यात एक कोटी ११ लाख ७८ हजार ९० प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७१ टक्के प्रवाशांना कार्ड मिळाले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांमध्ये वितरणाचे प्रमाण ७८ टक्के, तर महिलांमध्ये ते ६९ टक्के आहे.
ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे
पात्र प्रवाशांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. यासंदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी काढले आहेत.