सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे काम डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठेवले आहे. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांना उपनगरी रेल्वे प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
एमयूटीपी-३अंतर्गत सुमारे दोन हजार ७८२ कोटी रुपये खर्चून २९.६ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. सप्टेंबर २०२६ अखेर प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले होते. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पूल, बोगद्यांची कामे पूर्ण
या मार्गावर नऊ मोठे पूल, ३५ लहान पूल, पाच उड्डाणपूल आणि १६ भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. तीन बोगद्यांचे खोदकाम, अंतर्गत अस्तरीकरण आणि रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण ६९.७० किलोमीटरपैकी ६८.७० किलोमीटर रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सिग्नल यंत्रणेचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, मोहपे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत.
पाच स्थानकांचा समावेश
पनवेल, चिखले, पोयंजे (मोहपे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके या मार्गावर असतील. पनवेल, चिखले आणि पोयंजे येथील स्थानक इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. चौक स्थानकातील इमारत आणि भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. कर्जत स्थानकातील फलाट, लिफ्ट आणि सरकते जिने यांसारख्या प्रवासी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
सुरक्षा तपासणीनंतरच लोकल सेवा
प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येईल. मात्र, त्यानंतर लगेच लोकल सेवा सुरू होणार नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) तपासणी आणि आवश्यक सुरक्षा मंजुरी मिळणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतरच लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
संग्रहित छायाचित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.