दिवाळीत मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा अडथळा
लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीलाच ब्लॉक; पश्चिम रेल्वेचा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ऐन दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकचे नियोजन केल्याने मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान दाेन्ही दिशांकडील मार्गिकांवर दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने ब्लॉक टाळल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम :
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील लोकल नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५
परिणाम :
ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील, तसेच सीएसएमटी येथून पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील आणि ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलही रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. दरम्यान, ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरूळदरम्यान लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील.
पश्चिम रेल्वेचा दिलासा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात विनाव्यत्यय प्रवास करता येणार आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.