भेसळखोरांवर ‘एफडीए’चा बडगा
मुंबईत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : दिवाळी सणादरम्यान खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम राबवली. या दोन दिवसांच्या कारवाईत मुंबईतील २८ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले, तर बोरिवली येथील राजधानी बिर्याणी केंद्राचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल. संपूर्ण राज्यात १०५ परवाने निलंबित करण्यात आले असून, सात खाद्य आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्यात आला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईमध्ये भेसळ तसेच कृत्रिम रंगांचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वापर होत असल्याच्या संशयावरून प्रशासनाने मोठी कारवाई केली. मुंबईत दोन दिवसांत एकूण दोन हजार ३९६.६ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत १३ लाख ८७ हजार रुपये आहे. नागपाडा येथील ताहूरा स्वीट्स अँड बेकरीमधून ४२ किलो मावा जप्त करण्यात आला, तर मालाड येथील जेठाराम चुनिराम पूनिया या प्रतिष्ठानातून एक हजार ४५२ किलो काजू कतली, केशर काजू कतली आणि अन्य मिठाई जप्त करण्यात आली. वर्सोवा येथील महियार स्वीट अँड स्नॅक्स आणि विलेपार्ले येथील जामनगरी स्वीट्स अँड फरसाण या प्रतिष्ठानांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खाद्यरंग वापरल्याचे आढळून आले.
प्रतिबंधित गुटखाही जप्त
मुंबईत प्रतिबंधित खाद्यपदार्थांविरोधात कारवाई करताना २९ हजार २६८ रुपये किमतीचा गुटखा आणि अन्य प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी एक गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. संबंधित आस्थापन बंद करून सील करण्यात आले.
तीन गुन्हे दाखल
राज्यभरात ६९ हून अधिक प्रतिष्ठानांमधून एकूण ३९ हजार ४८५ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत एक कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय सात लाख ९६ हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच चार लाख ७० हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.