दिवाळीतही गर्भवतींची तपासणी सुरू
कामा रुग्णालयाचा दिलासा; महिलांसाठी विशेष सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गर्भवती महिलांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयाने १० आणि ११ नोव्हेंबर रोजी गर्भवती महिलांसाठीचा प्रसूतीपूर्व तपासणी विभाग (एएनसी ओपीडी) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ११ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातील इतर सर्व बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार असले, तरी गर्भवती महिलांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केला आहे. मुंबईसह शहराबाहेरील मुंब्रा, भिवंडी आणि इतर दूरच्या भागांतून मोठ्या संख्येने गर्भवती महिला नियमित तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात येतात.
अनेक महिलांना रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वेळापत्रकाची माहिती नसल्यामुळे लांबचा प्रवास करून आल्यानंतर विभाग बंद असल्यास तपासणीशिवाय परत जावे लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच गर्भावस्थेतील नियमित तपासण्यांमध्येही खंड पडण्याची शक्यता असते. सुट्टीमुळे नियमित बाह्यरुग्ण सेवा बंद असतानाही दूरवरून येणाऱ्या गर्भवती महिलांची महत्त्वाची वैद्यकीय तपासणी चुकू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
१०, ११ नोव्हेंबरला प्रसूतीपूर्व तपासणी विभाग सुरू
गर्भवती महिलांच्या आरोग्यसेवेत कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने १० नोव्हेंबर, मंगळवार आणि ११ नोव्हेंबर, बुधवार या दोन्ही दिवशी प्रसूतीपूर्व तपासणी विभाग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. १० नोव्हेंबर रोजी रुग्णालयातील सर्व बाह्यरुग्ण विभाग नेहमीप्रमाणे सुरू राहतील, मात्र ११ नोव्हेंबर रोजी इतर सर्व बाह्यरुग्ण विभाग बंद असतील. या दोन्ही दिवशी गर्भवती महिलांच्या विभागाचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.