मुंबई, ता. ८ : देशातील स्टार्टअप आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी केवळ मोठ्या शहरांमधील स्टार्टअप केंद्रे विकसित करणे पुरेसे नसून, देशभरातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि उदयोन्मुख शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आयआयटी मुंबईच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (साइन) या संस्थेने देशव्यापी ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम सुरू केला आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून देशातील स्टार्टअप इनक्युबेशन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि इनक्युबेटर्स यांच्यात संस्थात्मक सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सामूहिक क्षमता विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. दोन दशकांहून अधिक काळ तंत्रज्ञानाधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा अनुभव असलेल्या साइन संस्थेचे कौशल्य, कार्यपद्धती, मार्गदर्शन व्यवस्था आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संपर्कजाळे देशभरातील संस्थांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मॉडेलनुसार, साइन ही मध्यवर्ती ‘हब’ संस्था म्हणून काम करणार असून, भागीदार संस्था ‘स्पोक’ म्हणून सहभागी होतील. साइनकडून स्टार्टअप इनक्युबेशन, व्यवस्थापन, मार्गदर्शन, गुंतवणूकदारांशी संपर्क, कार्यक्रमांचे नियोजन आणि उद्योग क्षेत्राशी जोडणी याबाबत सहकार्य केले जाईल. तर सहभागी संस्था त्यांच्या संशोधन सुविधा, विशेष प्रयोगशाळा, तज्ज्ञ मनुष्यबळ, स्थानिक उद्योगसंपर्क आणि उद्योजकीय कौशल्यांचा या नेटवर्कसाठी उपयोग करून देतील.
सहकार्याची विविध क्षेत्रे निश्चित
उपक्रमांतर्गत विविध संस्थांमधील सहकार्यासाठी अनेक क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्टार्टअपची संयुक्त निवड आणि इनक्युबेशन, गुंतवणूकदारांशी संपर्क, निधी उभारणीसाठी मार्गदर्शन, इनक्युबेशन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संशोधन आणि बौद्धिक संपदेचे व्यावसायिकीकरण, सरकारी अनुदान योजनांची माहिती तसेच उद्योग आणि बाजारपेठेशी जोडणी यांचा समावेश आहे.
देशातील अन्य शहरांमध्येही विस्तार करणार
नागपूरमधील अनुभवाच्या आधारे हा हब-अँड-स्पोक उपक्रम पुढील काळात देशातील अन्य शहरे आणि राज्यांमध्येही विस्तारण्याचा साइनचा मानस आहे. विशेषतः मोठ्या स्टार्टअप केंद्रांबाहेर कार्यरत असलेल्या तंत्रज्ञानाधारित आणि डीप-टेक स्टार्टअपना दर्जेदार मार्गदर्शन, संशोधन सुविधा, उद्योगसंपर्क आणि भांडवल उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
५००हून अधिक स्टार्टअपना ‘साइन’चे सहकार्य
आयआयटी मुंबईमध्ये २००४ मध्ये स्थापन झालेली सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप ही तंत्रज्ञानाधारित व्यवसायांसाठीची इनक्युबेशन संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून मान्यता दिली आहे. आतापर्यंत साइनने ५००हून अधिक स्टार्टअपना इनक्युबेशन, मार्गदर्शन, पायाभूत सुविधा, उद्योग भागीदारी आणि निधी उभारणीसाठी सहकार्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.