मयूर फडके : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पॅराग्लायडिंग हा प्रामुख्याने पुरुषांचे वर्चस्व असलेला साहसी खेळ. भारतात या खेळासाठी आवश्यक असलेले प्रगत प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव असतानाही मुंबईच्या कानन ठाकूर या तरुणीने जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅराग्लायडिंगमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला गटात जागतिक क्रमवारीत बारावे स्थान मिळवणाऱ्या काननने नुकताच अवघ्या सात तास ३० मिनिटांत २५० किलोमीटरचे अंतर पार करण्याचा विक्रम केला आहे. भारतीय महिला पॅराग्लायडिंग खेळाडूंसाठी ही उल्लेखनीय कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरली आहे.
काननने वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. पहिल्याच भरारीत ती या खेळाच्या प्रेमात पडली. त्यानंतर प्रत्येक उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत ती प्रशिक्षणासाठी कामशेत येथे जाऊ लागली. दहावीनंतर १० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेलेली कानन तब्बल दोन महिने तेथे राहिली. वयाच्या सोळाव्या वर्षीच या खेळात करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला. पालकांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
आर्थिक अडचणींसह अनेक आव्हाने
पॅराग्लायडिंगसाठी ग्लायडर, हार्नेस, हेल्मेट आणि संपर्कासाठी रेडिओ यंत्रणा अशा उपकरणांवर लाखो रुपये खर्च होतात. भारतात या उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या अधिकृत सुविधाही मर्यादित आहेत. व्यावसायिक पायलट म्हणून भारतात विमा संरक्षण मिळवणेही मोठे आव्हान असल्याचे ती सांगते.
पॅराग्लायडिंग हा ९० टक्के मानसिक आणि १० टक्के शारीरिक क्षमतेवर अवलंबून असलेला खेळ आहे. अधिकाधिक मुलींनी या खेळाकडे वळावे. स्वतःची क्षमता, स्वप्न आणि मेहनतीवर विश्वास ठेवावा. मुलगा-मुलगी असा भेद न करता अथक परिश्रम केल्यास स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात.
- कानन ठाकूर, पॅराग्लायडिंग खेळाडू
मुंबई : कानन ठाकूर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅराग्लायडिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.