कृत्रिम तलावांवर २.६७ कोटींचा खर्च
गणेशोत्सवानंतर आर दक्षिण विभागात मंजुरीसाठी स्थायीसमाेर प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सवात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कांदिवली पूर्व आणि चारकोप परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांसह विविध सुविधांवर महापालिकेने तब्बल दाेन कोटी ६७ लाख १९ हजार रुपये खर्च केले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ही कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आता या खर्चाला कार्योत्तर मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या आर/दक्षिण विभागामार्फत कांदिवली पूर्व आणि चारकोप परिसरात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी १४ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. याशिवाय विसर्जनासाठी कामगार पुरविणे, लाकडी व्यासपीठ तयार करणे, बांबूचे बॅरिकेड्स उभारणे, कार्पेट पुरविणे आणि बसविणे अशा विविध सुविधांची कामे करण्यात आली. पंचशील उद्यानातील विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचाही या खर्चात समावेश आहे. अशा एकूण १६ कामांसाठी दाेन कोटी ६७ लाख १९ हजार ५७२ रुपये ४८ पैसे खर्च झाल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
राजीव गांधी क्रीडांगण, रायन शाळेजवळ, सुरभी हॉटेलसमोर, ठाकूर कॉम्प्लेक्स, बंदरपाखाडी तलाव परिसर, दादोजी कोंडदेव मैदान, राजे शिवाजी मैदान, भावेकर नगर, डिंगेश्वर तलाव परिसर, लालबहादूर मैदान, ठाकूर व्हिलेज, ठाकूर कॉलेज परिसर, महाराणा प्रताप गार्डन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, वडारपाडा आदी ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती.
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आणि ५० लाख रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या कामांची माहिती स्थायी समितीला १५ दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. त्यानुसार आयुक्तांच्या मंजुरीने करण्यात आलेल्या या १६ कामांचा तपशील आणि खर्चाचा प्रस्ताव आता स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.