फटाक्यांच्या ठिणग्यांनी पश्चिम रेल्वेचे सिग्नल ठप्प!
नालासोपारा-विरारदरम्यान सुक्या गवताला आग; लोकलचा खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई शहर आणि उपनगरांत आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या. या आगींचा फटका आता पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीलाही बसला आहे. नालासोपारा-विरारदरम्यान रेल्वे मार्गालगतच्या सुक्या गवताला रविवारी (ता. ८) रात्री आग लागून सिग्नल यंत्रणेच्या केबल जळाल्या. त्यामुळे या विभागातील अनेक ट्रॅक सर्किट निकामी झाली. परिणामी विरारहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले. सोमवारी सकाळी कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला.
नालासोपारा-विरारदरम्यान रेल्वे मार्गालगत फटाक्यामुळे रात्री ११.२०च्या सुमारास सुक्या गवताने पेट घेतला. आग काही वेळातच परिसरात पसरल्याने रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबल जळाल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियंत्रण करणारी अनेक ट्रॅक सर्किट निकामी झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या प्रयत्नांनंतर रात्री ११.५०च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आग विझल्यानंतरही सिग्नल यंत्रणेतील बिघाड कायम राहिल्याने रेल्वे वाहतूक पूर्ववत होऊ शकली नाही. सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने विरारहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांना सुरक्षिततेच्या नियमांनुसार विशेष कार्यपद्धतीने चालवावे लागत आहे. गाड्यांना दोन सिग्नल पार करून पुढे जावे लागत असल्याने त्यांचा वेग मंदावला. परिणामी एका लोकलमागे दुसरी लोकल खोळंबण्याचे प्रमाण वाढले. याचा परिणाम संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर झाला. सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल विलंबाने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळित झाले.
नवीन केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर
आगीत जळालेल्या केबल आणि खराब झालेली उपकरणे बदलण्याचे काम पश्चिम रेल्वेच्या सिग्नल विभागाने हाती घेतले आहे. वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. नवीन केबल टाकण्याबरोबरच ट्रॅक सर्किट पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत लोकल वाहतुकीवरील विलंबाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.