सेमीकंडक्टर स्टार्टअपना ‘आयआयटी’चे बळ
‘साइन एसीई’ उपक्रमाची सुरुवात; निवडक नवउद्योजकांना पाच कोटींपर्यंत गुंतवणुकीची संधी
मुंबई, ता. ११ : डीप-टेक क्षेत्रातील नवउद्योजकांना संशोधन आणि तंत्रज्ञान विकासापासून प्रत्यक्ष व्यावसायिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईच्या ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप’ (साइन) या संस्थेने ‘साइन एसीई’ हा विशेष प्रवेगक उपक्रम सुरू केला आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि सरकार यांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातील स्टार्टअपना संधी दिली जाणार आहे.
निवडक स्टार्टअपना या उपक्रमांना पाच कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. हा उपक्रम सोमवारी (ता. ९) सुरू करण्यात आला. या वेळी सरकार, उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अंतराळ केंद्राचे माजी विशिष्ट शास्त्रज्ञ आणि सहयोगी संचालक डॉ. शेषगिरी राव वेल्लंकी यांनी विशेष मार्गदर्शन केले, तर ‘मायटी स्टार्टअप हब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पन्नीरसेल्वम मदनगोपाल यांनी प्रमुख भाषण केले. डीप-टेक स्टार्टअपना पारंपरिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत संशोधन, तंत्रज्ञानाची पडताळणी आणि उत्पादन विकासासाठी अधिक वेळ लागतो. त्यासाठी विशेष पायाभूत सुविधा, तांत्रिक तज्ज्ञता, दीर्घकालीन भांडवल आणि संभाव्य ग्राहकांशी सातत्यपूर्ण संपर्क आवश्यक असतो. केवळ व्यवसाय विकास आणि निधी उभारणीपुरते मर्यादित न राहता, अशा स्टार्टअपना त्यांच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात चाचणी घेण्याची आणि सुरुवातीचे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ‘एसीई’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. स्टार्टअपना उद्योग क्षेत्रातील भागीदारांशी जोडणे, तंत्रज्ञानाची पडताळणी करणे, संकल्पनांचे प्रायोगिक प्रारूप विकसित करणे आणि संभाव्य व्यावसायिक भागीदारी निर्माण करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
--
स्टार्टअपला उद्योगाशी जोडण्याची संधी
देशभरातून अर्ज मागवून तंत्रज्ञान सज्जता स्तर चार किंवा त्यापुढील स्तरावर असलेल्या सहा ते आठ सेमीकंडक्टर स्टार्टअपची निवड केली जाणार आहे. प्रत्येक स्टार्टअपला एका उद्योग भागीदाराशी जोडले जाईल. तसेच उद्योग क्षेत्र, साइन किंवा आयआयटी मुंबई आणि गुंतवणूक क्षेत्रातील प्रत्येकी एका मार्गदर्शकाचा समावेश असलेली मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रक्रियेतून निवड झालेल्या आशादायी स्टार्टअपना साइन किंवा त्यांच्या व्हेंचर कॅपिटल फंड ‘वाय-पॉइंट’मार्फत पाच कोटी रुपयांपर्यंत इक्विटी गुंतवणुकीसाठी विचार केला जाऊ शकतो.
गरजांनुसार चाचणी
आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, आयआयटी मुंबईच्या उत्कृष्टता केंद्रांमध्ये सखोल संशोधन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा स्टार्टअप आणि उद्योग भागीदारांशी जोडल्यामुळे प्रयोगशाळेत विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील गरजांनुसार चाचणी घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.