‘महानगरी’च्या चेन पुलिंगमुळे लोकलचा खोळंबा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शुक्रवारी (ता. १३) सकाळी महानगरी एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंगमुळे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळित झाले. सायनदरम्यान ही एक्स्प्रेस २७ मिनिटे थांबल्याने सीएसएमटी आणि दादरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांना सुमारे अर्धा तास विलंब झाला, सकाळच्या गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
ट्रेन क्रमांक २२१७७ महानगरी एक्स्प्रेस सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.१५ वाजता सुटणार होती, मात्र विविध कारणांमुळे ही गाडी मुंबई उशिरा पोहोचली. त्यामुळे आपल्या निर्धारित वेळेत ही गाडी रवाना होऊ शकली नाही. तब्बल १० तासांच्या विलंबानंतर शुक्रवारी सकाळी १०.११ वाजता ती सीएसएमटीहून सुटली, मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच सायनदरम्यान काळी १०.५० वाजता चेन पुलिंगमुळे गाडी थांबली.
त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सकाळी ११.१७ वाजता गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या घटनेमुळे डाऊन जलद मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
लोकल प्रवाशांना मनस्ताप
महानगरी एक्स्प्रेस डाऊन जलद मार्गावर थांबल्याने त्याच मार्गावरून धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. सीएसएमटी आणि दादरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल फेऱ्या सुमारे अर्धा तास उशिराने धावल्या. सकाळी कामावर पोहोचण्याची घाई असताना लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले. मेल-एक्स्प्रेसमधील चेन पुलिंगचा फटका उपनगरी रेल्वे प्रवाशांनाही बसत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.