निकृष्ट कामासाठी इंटिरियर कंपनीला दणका
७१.६२ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : एका सदनिकाधारकाला अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे नूतनीकरणाचे काम करून त्याच्यासह कुटुंबीयांना जीवघेणा धोका निर्माण केल्याबद्दल एका इंटिरियर डिझायनर कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला तसेच ७१.६२ लाख रुपयांहून अधिक रक्कम परत करण्याचे आदेश दिले. आयोगाने कंपनीच्या वर्तनाला निष्काळजी आणि सेवेतील कमतरतेचा कळस असल्याचे निरीक्षणही नोंदवले.
महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने बंगळूरस्थित लिव्हस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इंटिरियर डिझायनर कंपनीला त्यांच्या प्रशासकीय गोंधळ आणि व्यावसायिक देखरेखीतील अभावाबद्दल फटकारले. प्रमुख नियुक्त कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता बाहेर पडले आणि घरमालकाच्या संमतीशिवाय एकतर्फी काम करणारे बदलण्यात आले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे हे काम अनेक महिने पूर्णपणे दिशाहीन झाले. या अनियमित व्यवस्थापनामुळेच निकृष्ट दर्जाचे काम आणि मोठा विलंब झाल्याचे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच सुरक्षेच्या गंभीर उल्लंघनामुळे सदनिका मालकाचा मुलगा आणि कुटुंबातील वृद्ध सदस्यांसाठी जीवघेणा धोका निर्माण झाल्याचेही अधोरेखित करून कंपनीला सेवेत मोठी त्रुटी, कमतरतेसाठी दोषी ठरवले आणि तक्रारदाराला ७१.६२ लाख रुपयांच्या परताव्याव्यतिरिक्त १ सप्टेंबर २०२४ पासून नऊ टक्के वार्षिक व्याजासह देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराला मानसिक त्रास, शारीरिक छळ आणि सुरक्षेच्या धोक्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेशही आयोगाने कंपनीला दिले. आयोगाने तक्रारदाराला खटल्याच्या खर्चापोटी ५०,००० रुपये देण्याचेही आदेश दिले.
प्रकरण काय?
गोरेगावस्थित तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या ३०व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या इंटिरियर डिझाईन आणि नूतनीकरणासाठी ७१,६२,००४ रुपये संबंधित कंपनीला आगाऊ देऊन कामाचे कंत्राट दिले होते. हे काम सुरुवातीला ९० ते १२० दिवसांत पूर्ण होणे आणि १ जुलै २०२४ला ताबा मिळणे अपेक्षित होते, परंतु ही तारीख वाढवून १ सप्टेंबर २०२४ केली. कंपनी वाढवलेली मुदत पाळण्यात अयशस्वी ठरली आणि कर्मचारी काम अपूर्ण सोडून गेले. सदोष कामामुळे स्वयंपाकघरातील शटर त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर पडल्याच्या घटनेचा उल्लेख करीत सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचेही म्हटले होते. सतत होणारा विलंब, निकृष्ट दर्जाचे काम, मानसिक त्रास आणि प्रतिसाद न मिळाल्याने व्यथित होऊन त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.
निकृष्ट दर्जाचे काम
वृत्तपत्रात नोटीस बजावूनही लिव्हस्पेस आयोगासमोर हजर न झाल्याने या प्रकरणाची सुनावणी एकतर्फी झाली. कंपनीने ब्रँडेड उत्पादने आणि उच्च दर्जाच्या साहित्याचे आश्वासन देऊन पद्धतशीरपणे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आणि निधी उकळला, अशा निष्काळजी आणि धोकादायक कामाबद्दल आयोगाने आश्चर्य व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.