पुनर्विकासाचा खर्च १८० कोटींवर
सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी २१.९० कोटींची वाढीव तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या तीन वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ करण्यात येणार आहे. जे. पी. नगर (गोरेगाव), आकुर्ली रोड (कांदिवली पश्चिम) आणि बाभई नाका (बोरिवली पश्चिम) येथील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आता एकूण १८० कोटी ६१ लाख रुपयांचा सुधारित खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या सुधारित खर्चात २१ कोटी ९० लाख रुपयांची वाढ झाली असून, या प्रस्तावाला स्थापत्य समिती (उपनगरे) आणि स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
महापालिकेच्या आश्रय योजनेंतर्गत या तीन ठिकाणी जुन्या चाळी व इमारती पाडून बहुमजली इमारती उभारण्यात येत आहेत. या कामासाठी सुरुवातीला ९७ कोटी ८१ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर बांधकाम क्षेत्रफळात वाढ झाल्याने जुलै २०२४ मध्ये पहिला फेरफार करण्यात आला. त्या वेळी कंत्राटाची रक्कम १३१ कोटी १७ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. आता दुसऱ्या फेरफारानुसार कंत्राटाची रक्कम १५० कोटी ४२ लाख रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. तर इतर आनुषंगिक खर्चांसह एकूण सुधारित अंदाजित खर्च १८० कोटी ६१ लाख रुपये होणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम क्षेत्रफळात सुरुवातीच्या २१ हजार ६७६.१३ चौरस मीटरवरून वाढ होऊन ते ३३ हजार ३५.३७ चौरस मीटर झाले आहे. म्हणजेच बांधकाम क्षेत्रफळात ११ हजार ३५९.२४ चौरस मीटर अर्थात ५२.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अग्निशमन दलाच्या आवश्यकतांनुसार तसेच अधिक चांगले वायुविजन, रुंद पॅसेज आणि सामुदायिक सुविधांसाठी आराखड्यांमध्ये बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दहा महिन्यांची मुदतवाढ
बांधकाम क्षेत्रफळात झालेल्या वाढीमुळे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १० महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा कालावधी २४ महिन्यांऐवजी ३४ महिने करण्यात येणार आहे. याशिवाय कामाचा कालावधी २४ महिन्यांपेक्षा अधिक झाल्याने कंत्राटातील किंमत फरकाची तरतूद पाच टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली आहे. मात्र, ही दरवाढ मंजूर ३४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केलेल्या कामांपुरतीच लागू राहणार आहे. त्यापुढील विलंबासाठी कंत्राटदाराला दरवाढीचा लाभ मिळणार नाही. मुदतवाढीच्या कारणावरून भविष्यात कोणताही अतिरिक्त दावा करणार नसल्याचे हमीपत्रही कंत्राटदार मेसर्स देव इंजिनिअर्स यांच्याकडून घेण्यात आले आहे.
........
असा आहे प्रकल्प...
सुधारित आराखड्यानुसार जे. पी. नगर येथे २३ मजली इमारत, आकुर्ली रोड येथे स्टिल्ट अधिक १८ मजली इमारत, तर बाभई नाका येथे तळमजला अधिक सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी ३०० चौरस फुटांच्या आणि ६०० चौरस फुटांच्या सदनिका प्रस्तावित आहेत. आकुर्ली रोड येथे ३०० चौरस फुटांच्या १६९ आणि ६०० चौरस फुटांच्या ३६ सदनिका असतील. जे. पी. नगर येथे २२१, तर बाभई नाका येथे ५५ सदनिका प्रस्तावित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.