राज्यात ‘एसओ२’ उत्सर्जन व्यापार याेजना
आज उद्घाटन; देशातील पहिलाच उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : औद्योगिक वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात देशातील पहिली राज्यव्यापी सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन व्यापार योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि एमिशन्स मार्केट ॲक्सिलरेटर (ईएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे १३ कोटी नागरिकांना स्वच्छ हवेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे योजनेचे उद्घाटन बुधवारी (ता. १७) होणार आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम हाेणार असून, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह विभागाच्या सचिव जयश्री भोज आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या योजनेनुसार सहभागी उद्योगांना सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनाचे परवाने खरेदी-विक्री करता येणार आहेत. कमी खर्चात प्रदूषण कमी करण्याची क्षमता असलेल्या उद्योगांना अधिक उत्सर्जन कपात करून अतिरिक्त परवाने विकण्याची संधी मिळेल. प्रदूषण कमी करण्यासाठी तुलनेने अधिक खर्च येणाऱ्या उद्योगांना हे परवाने खरेदी करून निर्धारित मर्यादेत राहता येईल. त्यामुळे उद्योगांवरील आर्थिक भार कमी होण्यासह एकूण उत्सर्जन नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.
---
अधिकारी, निरीक्षकांना प्रशिक्षण
औद्योगिक प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगचाही वापर करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करण्याची शक्यता अधिक असलेल्या उद्योगांची ओळख पटवून त्यांची जोखीमाधारित तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जाणार आहे. एमपीसीबीच्या अधिकारी आणि निरीक्षकांनाही या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
......