मुंबई, ता. १६ : मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी १३.४० मीटर रुंदीचा नवीन रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. शांताराम तलावाजवळून स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, कुरार पोलिस ठाण्याच्या परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी तो सुधार समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
कुरार व्हिलेजमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. शांताराम तलाव मार्गे परिसरात प्रवेश करताना तसेच सावरकर मैदानाच्या दिशेने जाताना अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती वर्दळ यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी कुरार पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिसरातील मुंबई पब्लिक स्कूल, रुग्णालये आणि दाट लोकवस्तीमुळे या समस्येत आणखी भर पडते. वाहतूक कोंडीचा फटका पादचाऱ्यांनाही बसत आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित रावराणे यांनी महापालिका प्रशासनाकडे नवीन रस्ता विकसित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे, विकास आराखडा २०३४ मध्ये या रस्त्याचे आरक्षण यापूर्वीच दर्शविण्यात आले असून, प्रस्तावित रस्त्यासाठी आवश्यक जमीन महापालिकेच्या मालकीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुधार समितीच्या मंजुरीची अपेक्षा
नवीन रस्ता विकसित झाल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरून कुरार व्हिलेजमध्ये येणाऱ्या वाहनांचे विभाजन करणे शक्य होईल. त्यामुळे सध्याच्या मुख्य मार्गावरील वाहनांचा भार कमी होऊन वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच सावरकर मैदानाकडे जाणाऱ्या नागरिकांनाही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. आता सुधार समितीच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.