सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. मुंबई सेंट्रल विभागाने राबविलेल्या ‘ऑपरेशन दीप’मध्ये अवघ्या १५ दिवसांत तब्बल ९४ हजार ९१९ प्रवासी तिकीट तपासणीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून आठ कोटी २३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत दंडवसुलीत तब्बल ५३.६ टक्क्यांनी वाढ झाली असून, रेल्वेने निर्धारित केलेले उद्दिष्टही ओलांडले आहे.
३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. दिवाळीच्या काळात मुंबईहून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मोठी गर्दी होती. या गर्दीत विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित तिकिटांवर प्रवास करणारे तसेच आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांविरोधात विशेष तपासणी करण्यात आली.
उद्दिष्टापेक्षा ५७ लाखांची अधिक वसुली
मुंबई सेंट्रल विभागाला या मोहिमेतून सात कोटी ६५ लाख ४१ हजार रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात ८ कोटी २२ लाख ९९ हजार ३०० रुपयांची वसुली झाली. म्हणजेच निर्धारित उद्दिष्टापेक्षा सुमारे ५७ लाख रुपये अधिक मिळाले. गतवर्षी याच कालावधीत ५.३६ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा त्यात मोठी वाढ नोंदविण्यात आली.
स्थानकांपासून धावत्या गाड्यांपर्यंत धडक मोहीम
मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, अंधेरी, वसई आणि विरार या प्रमुख स्थानकांवर विशेष पथके तैनात करण्यात आली होती. स्थानकांवरील तपासणीबरोबरच धावत्या गाड्यांमध्येही अचानक तपासणी करण्यात आली. विशेषतः आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
चार टप्प्यांत कारवाई
‘ऑपरेशन दीप’अंतर्गत प्रवाशांचा शोध, तिकीट तपासणी, नियमांची अंमलबजावणी आणि दंडवसुली अशा चार टप्प्यांत मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तिकीट तपासणी कर्मचारी आणि पर्यवेक्षकांनी समन्वयाने काम केले. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याबरोबरच नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त प्रवास मिळावा, हाही मोहिमेचा उद्देश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.