‘बेस्ट’ने टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू करावी!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट टॅक्सी, रिक्षा अशा परिवहन सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे बेस्ट प्रशासनाकडे आहे. बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे महसूलवाढीसाठी त्यांनी हा पर्याय सुचविला आहे.
‘बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचा अंगीकृत भाग असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित, विश्वासार्ह आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात बेस्टची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, मात्र सध्या हा उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीत बदल करून काळानुरूप बदलण्याची गरज आहे,’ असे प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ‘मुंबईतील मेट्रो रेल्वे, बेस्ट आदी विविध सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत किंवा गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी ‘लास्ट माईल’ कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असते. सध्या ही गरज मोठ्या प्रमाणावर खासगी रिक्षा व टॅक्सी सेवांद्वारे पूर्ण केली जाते. बेस्ट उपक्रमाकडे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवासीवर्ग, बस आगार, बस स्थानके, वाहतूक व्यवस्थापनाचा अनुभव, तसेच नागरिकांचा विश्वास यांचा मोठा आधार आहे, यामुळे बेस्ट प्रशासनाने बससोबत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी उपक्रम सुरू करावेत.’ या उपक्रमामुळे बेस्टला महसूल मिळेल, असा पर्याय नगरसेवक गंगाधरे यांनी सुचविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.