स्थानकांत हुतात्मादिनी
महाराष्ट्रगीत लागणार?
रेल्वेला मराठी अभ्यास केंद्राचे साकडे
मुंबई, ता. १६ : हुतात्मा दिनानिमित्त राज्यातील सर्व स्थानकांवर शनिवारी (ता. २१) ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ ही गीते वाजविण्यासह १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची माहिती देणाऱ्या विशेष उद्घोषणा करण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. यासंदर्भात मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनासह रेल्वे बोर्डालाही निवेदन देण्यात आले आहे. छठपूजेच्या भाेजपुरी गीतांच्या वादावरून राज्यातील रेल्वे स्थानकांवर अन्य राज्यांतील सणांना महत्त्व दिले जात असल्याचा आक्षेपही केंद्राने घेतला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला व्हावी आणि प्रवाशांना महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ या गीतांची मागणी करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार झाला होता. या आंदोलनात अनेक आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ नोव्हेंबरला हुतात्मा दिन पाळला जातो. या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८पर्यंत महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उद्घाेषणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी ही निवेदने दिली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित स्थानकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
------
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राच्या भाषा, संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित गाणी वाजविणे ही रेल्वेची प्राथमिक जबाबदारी आहे. राज्यगीताबराेबरच हुतात्मा दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि १०७ हुतात्म्यांचे योगदान यांची माहिती शोधून ती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे काम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने करावे.
- डॉ. दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
-----
रेल्वे बोर्डालाही विचारला जाब
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर स्थानिक संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी अन्य राज्यांतील सणांची गाणी वाजविली जात असल्याचा आक्षेप मराठी अभ्यास केंद्राने घेतला आहे. प्रवाशांनी आक्षेप घेतल्यास दिल्लीवरून आदेश असल्याचे सांगितले जाते, असा दावा केंद्राने केला आहे. हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजविण्यास रेल्वे बोर्डाची बंदी आहे का, असा सवाल करून केंद्राने बोर्डाच्या अध्यक्षांनाही पत्र पाठविले आहे. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.