मुंबईतच घरांसाठी एल्गार
लालबागमध्ये गिरणी कामगारांच्या ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,’ ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मालकीची,’ मुंबईच्या वैभवात योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, अशा घोषणा देत, गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांनी सोमवारी (ता. १६) लालबाग परिसर दणाणून सोडला.
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत, या मागणीसाठी आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने ठिय्या आंदोलन केले. ८ ऑक्टोबर रोजी विधान परिषदेचे उपनेते सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अप्पर गृहसचिव असीम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिवस्तरावरील बैठकीत, छोट्या-छोट्या भूखंडाचे एकत्रीकरण करून गृहसंकुल उभे करणे, गिरणी कामगार संकुलातील संक्रमण शिबिरातील घरे गिरणी कामगारांना देणे, बांधलेल्या घरांची सोडत काढणे, एनटीसी गिरण्यांच्या जागा ताब्यात घेणे, इत्यादीमार्फत मुंबईत उपलब्ध होणाऱ्या घरांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली होती, मात्र १९ ऑक्टोबरच्या शासकीय निर्णयात महामुंबईतील खासगी विकासाच्या प्रकल्पातील घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्याचा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या शासकीय निर्णयात उर्वरित घरांसाठी मुंबईत जागा नसल्याचाही उल्लेख आहे, ही गोष्ट ८ तारखेच्या बैठकीशी विसंगत आणि कामगारांमध्ये निराशा निर्माण करणारी आहे. त्याच्या निषेधार्थ गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने जोरदार आंदोलन केले. यावेळी लढा समितीचे निमंत्रण आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सर्व श्रमिक संघटनेचे कॉम्रेड उदय भट, गिरणी कामगार सेनेचे सत्यवान उभे आणि बाळ खवणेकर आदी उपस्थित होते.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
- ‘एनटीसी’च्या जागा राज्य सरकारने ताब्यात घेऊन घरे बांधावीत
- इंदू मिलच्या जागेवर म्युझियमची जागा वगळून उर्वरित जागेवर घरे बांधावीत
- सेंचुरी मिरच्या ६ एकर जागेवर घरे बांधावीत
- खटाव मिलची जागा आणि खटाव बोरिवली येथील जागा घर बांधणीसाठी द्यावी
- रिपेरिंग बोर्ड, एसआरए पुनर्विकासात १ एफएसआय देऊन घरे बांधावीत.
- संक्रमण शिबिरातील उपलब्ध जागेवर घरे द्यावीत
- गिरण्यांच्या जुन्या चाळींच्या पुनर्विकासात १ एफएसआय वाढवून अतिरिक्त घरे द्यावीत
- बेकायदा नोंदणीबाबत तक्रारी अर्ज निकाली काढवीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.