दिवाळीनंतर हवेचा स्तर खालावला
कुलाब्यात प्रदूषणाचा सर्वाधिक विळखा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दिवाळीनंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत पुन्हा घसरण झाली असून, शहराचा वायुप्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) सोमवारी (ता. १६) १३२ वर पोहोचला. गेल्या तीन दिवसांपासून हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत कायम असली, तरी अनेक भागांमध्ये प्रदूषणाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. कुलाबा येथे सर्वाधिक २५६, तर मालाड पश्चिम येथे १८८ आणि देवनार येथे १७६ एक्यूआयची नोंद झाली. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हवेच्या गुणवत्तेच्या नोंदीनुसार, शनिवारी (ता. १४) मुंबईचा एक्यूआय १३१ होता. रविवारी १५ नोव्हेंबरला तो वाढून १३६ झाला, तर १६ नोव्हेंबरला किंचित घसरून १३२ वर आला, मात्र ही घसरण दिलासादायक म्हणता येणार नाही. कारण शहरातील अनेक प्रदूषण निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर नोंदविण्यात आली आहे. कुलाबा येथे २५६ एक्यूआयची नोंद झाली असून, हा शहरातील सर्वाधिक आकडा आहे. मालाड पश्चिम १८८, देवनार १७६, शिवाजीनगर १७५, माझगाव आणि मुलुंड पश्चिम प्रत्येकी १३७, भांडुप १३१, शिवडी १२९, तर वरळी सिद्धार्थनगर येथे १२७ एक्यूआय नोंदविण्यात आला. वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रावर २१५ एक्यूआयची नोंद झाली. याउलट वरळी, सायन, पवई आणि भायखळा परिसरात तुलनेने कमी प्रदूषणाची नोंद झाली. दरम्यान, शहरातील २६ पैकी २५ प्रदूषण निरीक्षण केंद्रे कार्यरत होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक्यूआय ७७ ते १०८ दरम्यान असताना ९ नोव्हेंबरला तो १७२ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काहीशी सुधारणा झाली असली, तरी प्रदूषणाचा धोका कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.