बेस्टच्या बस मार्गांना कात्री
सहा वर्षांत ५४ मार्ग बंद; ९२ मार्गांची लांबी घटली, प्रवाशांची गैरसोय वाढली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट बस सेवेचे जाळे दिवसेंदिवस आक्रसत चालले आहे. गेल्या सहा वर्षांत बेस्ट उपक्रमाने तब्बल ५४ बस मार्ग बंद केले, तर ९२ मार्गांची लांबी कमी केली आहे. त्यामुळे २०१०-११ मध्ये ५०४ असलेली बस मार्गांची संख्या आता सुमारे ४०५ वर आली आहे. प्रवाशांची कमी संख्या, वाहतूक कोंडी आणि विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे ही कारणे देत बेस्ट प्रशासनाकडून मार्गांमध्ये कपात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक मार्गांवर प्रवाशांची गरज कायम असल्याचा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे.
बेस्टच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ४२७ असलेली मार्गसंख्या २०२५ मध्ये ४०१ वर आली. या वर्षात १८ मार्ग बंद, तर १९ मार्गांची लांबी कमी करण्यात आली. २०२६ मध्ये नोव्हेंबरपर्यंत आणखी तीन मार्ग बंद करण्यात आले असून, १३ मार्गांची लांबी कमी करण्यात आली आहे. त्यामध्ये बोरिवली ते नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडणारा ए-४७१ हा बेस्टच्या लांब पल्ल्याच्या मार्गाचाही समावेश आहे. सुरुवातीला २०२१ मध्ये हा मार्ग घाटकोपर आगारापर्यंत मर्यादित करण्यात आला होता. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत तो पूर्णपणे बंद करण्यात आला.
सांताक्रूझ-मुलुंड, कुर्ला-गोराई, मालाड-ठाणे, ट्रॉम्बे-सांताक्रूझ, धारावी-मुलुंड आणि घाटकोपर-बोरिवली या मार्गांवरील सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. बोरिवली स्थानक ते दहिसरमधील सरस्वती संकुलदरम्यान धावणारी ए-२१६ ही फिडर बससेवाही बंद झाली आहे.
सध्या बेस्टच्या ताफ्यात २,८७७ बस असून त्यापैकी केवळ २४९ बस बेस्टच्या मालकीच्या आहेत. उर्वरित २,६२८ बस भाडेतत्त्वावर चालविल्या जात आहेत. एकेकाळी दररोज ४२ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बेस्टची प्रवासीसंख्या २०२५ मध्ये सरासरी २८.०५ लाखांवर आली आहे.
प्रवासी संघटनांचा दावा
प्रवासी संघटनांनी मार्ग बंद करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक बंद बस मार्गांवरील थांब्यांजवळ आता शेअर रिक्षा आणि टॅक्सी उभ्या असतात. यावरून त्या मार्गांवर प्रवाशांची गरज कायम असल्याचे दिसते, असा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे. मार्ग बंद करण्यापूर्वी प्रवाशांची मते जाणून घेतली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. बस मार्गांमधील कपातीमुळे प्रवाशांना दोन ते तीन वाहने बदलून प्रवास करावा लागत असून प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.