प्रतिबंधित घटकांच्या पूरक आहारावर कारवाई
घाटकोपरमधील हॉटेलसह जोगेश्वरीतील मिठाई दुकानाचा परवाना निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : प्रतिबंधित घटकांचा वापर असलेल्या पूरक आहार उत्पादनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत कारवाई केली. वडाळा आणि जोगेश्वरी येथील दोन आस्थापनांमधून पाच लाख ५८ हजार ९२२ रुपये किमतीची उत्पादने जप्त करण्यात आली. याशिवाय घाटकोपरमधील हॉटेल आणि जोगेश्वरीतील मिठाई दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
वडाळा येथील राहुल डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. या आस्थापनातून ‘अल्टिब्रेन-एस’ या उत्पादनाची ५० हजार ३९९ रुपयांची १०१ पाकिटे जप्त करण्यात आली, तर जोगेश्वरी पूर्व येथील अमृतलाल अँड ब्रदर्स या आस्थापनातून ‘अल्टिब्रेन’, ‘मिटोब्रेन’, ‘रेजुव्हान्स’, ‘ऑलिगोनॉर्म’ यांसह २० प्रकारच्या उत्पादनांचा पाच लाख आठ हजार ५२३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांमध्ये प्रतिबंधित निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड (एनएमएन) तसेच उत्पादनाची मान्यता नसलेल्या मॅग्नेशिअम ॲसिटाइल टॉरेट या घटकांचा वापर केल्याचे आढळले. उत्पादनांच्या वेष्टनावरील माहितीतही विसंगती आढळून आली. घाटकोपर पूर्व येथील साई किचन (बिग फॅट मंक) या हॉटेलमध्ये अस्वच्छता, कीटकांचा वावर, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची एकत्रित साठवणूक, कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने व वैद्यकीय नोंदी नसल्याचे आढळले. तपासणीत या आस्थापनाला केवळ ४८ टक्के गुण मिळाल्याने परवाना निलंबित करण्यात आला. जोगेश्वरी पूर्व येथील सुजित क्रिमी क्रिएशन (७थ हेवन) या मिठाई दुकानाचाही परवाना निलंबित करण्यात आला.
कांदिवलीत कारवाई
कांदिवली पश्चिम येथील दोन पान दुकानांमधून विमल, राजनिवास, बाजीराव, कमलापसंद यांसह १५ प्रकारच्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची ८७० पाकिटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.