बाळासाहेबांच्या अपमानावरून रणकंदन!
महापौरांनी तहकुबी मागणी फेटाळली; विरोधकांचा सभात्याग
मुंबई, ता. १८ : शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या शायना एन. सी. यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद बुधवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत सभा तहकूब करण्याची मागणी केली; मात्र महापौर रितू तावडे यांनी ती मागणी फेटाळल्याने शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे महापालिका सभागृहात काही काळ प्रचंड गदारोळ झाला.
महापालिका सभेला सुरुवात होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मुख्यालयाच्या आवारात शायना एन. सी. यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहातही निषेध नोंदविण्यात आला. महापौरांनी आरोग्य व्यवस्थेबाबतच्या निवेदनावर चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले असताना विरोधी पक्षनेत्या पेडणेकरांनी बाळासाहेबांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला. बाळासाहेब आमचे दैवत असून, या घटनेचा निषेध झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शायना एन. सी. जिथे सत्ता तिथे जातात, अशी टीकाही त्यांनी केली; मात्र त्या सभागृहाच्या सदस्य नसल्याने त्यांचे नाव घेण्यास भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर महापौरांनीही त्यांचे नाव घेऊन कामकाजात अडथळा निर्माण करू नये, अशी सूचना केली. त्यावर बाळासाहेबांबद्दल तुमचे प्रेम केवळ नावापुरते आहे का, असा सवाल पेडणेकर यांनी केला. बाळासाहेबांचा अपमान झाल्याची घटना गंभीर असली तरी सभा तहकूब करता येणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सभागृहनेते गणेश खणकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत सकाळच्या भूपाळीचा उल्लेख केला. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करीत ठाकरे गटाला सवाल केला. यावरून भाजप-शिवसेना आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. बाळासाहेबांच्या अपमानापेक्षा सत्ताधाऱ्यांना दैनंदिन कामकाज महत्त्वाचे वाटत असल्याचा आरोप करीत अखेर विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.
----
महापौरांना घेराव
सभेचे कामकाज संपल्यानंतर विरोधकांनी महापौर दालनात जाऊन त्यांना घेराव घालत जाब विचारला. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकरणावर किमान अर्धा ते पाऊण तास चर्चा घडवून आणण्यास हरकत नव्हती, असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. एवढी मोठी घटना घडूनही शिंदे गटाचे नेते शांत का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी उपस्थित केला.
----
पत्रकारांना रोखण्याचा प्रयत्न
महापौरांना घेराव घालण्याच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी महापालिकेतील सर्व पत्रकार महापौरांच्या दालनात गेले; मात्र महापौरांच्या स्वीय सहाय्यकांकडून त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले. महापौर दालनात वार्तांकन करू नका, तसेच कोणत्याही प्रकारचे छायाचित्र काढू नका, अशा सूचना पत्रकारांना देण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर स्वीय सहाय्यकांनी सुरक्षा रक्षकांना सांगून पत्रकारांना दालनाबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.