प्रभादेवीत १०१ बांधकामांवर
आजपासून रेल्वेचा हातोडा
पश्चिम रेल्वेची तयारी पूर्ण; २०२२मध्येच नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर गुरुवार (ता. १९) आणि शुक्रवार (ता. २०) रोजी पश्चिम रेल्वेकडून हातोडा चालविण्यात येणार आहे. या कारवाईची तयारी पूर्ण झाली असून, पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. या कारवाईमुळे ५० ते ६० वर्षांपासून परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. त्यामुळे बांधकामे हटविण्यापूर्वी पुनर्वसन करावे, अशी मागणी संत रोहिदास रहिवासी संघाने केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या सर्वेक्षणात प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील दक्षिण टोकाला रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर दिलीप सुखदेव यांच्यासह अन्य १०० जणांविरोधात सार्वजनिक परिसर (अनधिकृत कब्जा हटविणे) कायद्यांतर्गत (पीपीई ॲक्ट) २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी आणि अंतिम तोंडी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १२ ऑक्टोबर २०२६ रोजी निष्कासनाचे आदेश देण्यात आले.
चार वर्षांनंतर कारवाईचा मुहूर्त
निष्कासनाचे आदेश १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान संबंधितांना बजावण्यात आले. त्यानंतर १४ नोव्हेंबरला अतिक्रमित जागेवर सार्वजनिक सूचना लावून कारवाईच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार १९ आणि २० नोव्हेंबरलाबांधकामे हटविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.