मुरूड, ता. ३० (बातमीदार) ः परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठवडाभरापासून तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. नदी, नाले तुडुंब भरले आहेत; मात्र रविवारी पावसाने विश्रांती घेताच समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
पर्यटनावर आधारित व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याने लॉजिंग, खाणावळ तसेच साहसी खेळ व अन्य व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जमेची बाजू म्हणजे मंगळवारपासून (ता. २) जंजिरा किल्ला पुरातत्त्व विभागातर्फे पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. तसेच, मासेमारी सुरू झाल्याने खवय्यांना ओले बोंबिल, कोळंबी, सुरमई, पापलेट, हलवा आदी मासळी मुबलक मिळत आहे. याशिवाय ताज्या, गोड्या माडीचा आस्वादही घेता येणार आहे.
काही दिवसांपासून पर्यटकांविना सुने सुने पडलेले समुद्रकिनारे पुन्हा एकदा गजबजले आहेत. वीकेण्डसाठी हजारो पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले होते. अनेक जण घोडागाडी, वॉटर्स राइड्स, उंट सफारीचा आनंद घेताना दिसले. अनेकांनी ताज्या मासळीवर ताव मारला. पर्यटकांच्या येण्याने कॉटेजेस, हॉटेल्स मालकांमध्ये उत्साह दिसून आला.
आगामी नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीसारख्या सणांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे. मुरूडमधील श्री दत्त देवस्थान, ऐतिहासिक जंजिरा, पद्मदुर्ग, खोकरीचे गुंबज, अंबोली धरण, हिरवाईने नटलेला गारंबी परिसर, दिघी पलीकडील जंगलजेटी आदी पर्यटनस्थळांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी, स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.