डम्पिंग ग्राउंडप्रकरणी तटकरे आक्रमक
स्थळ पाहणी करत अधिकाऱ्यांना फटकारले; काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल रोखण्याचे निर्देश
म्हसळा, ता. २२ (बातमीदार) : म्हसळा शहराजवळील दुर्गवाडी रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरून नागरिकांचे हाल झाले. या घटनेची विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून नगर पंचायत प्रशासनाला धारेवर धरले. डम्पिंग ग्राउंडचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराला एकही रुपया अदा करू नये, अशा सक्त सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
शनिवारी रात्री लागलेल्या आगीतून निघालेल्या धुरामुळे शहरासह परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या आगी अपघाती आहेत की मुद्दाम लावल्या जातात, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पाहणीदरम्यान आमदार तटकरे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून नव्या डम्पिंग ग्राउंडचे रखडलेले काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच १० जुलैपर्यंत नागरिकांना त्रास देणारा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
चौकट
वारंवार लागणाऱ्या आगींचे गूढ कायम
गेल्या तीन वर्षांत म्हसळा डम्पिंग ग्राउंडला अनेकदा आग लागली आहे. प्रत्येक वेळी अग्निशमन दलाकडून आग विझवली जात असली, तरी आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, निष्काळजी किंवा जाणीवपूर्वक आग लावण्याची शक्यता यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
फोटो -म्हसळा येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीची पाहणी करताना आमदार अनिकेत तटकरे (छाया -उदय कळस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.