स्वच्छतेच्या आवाहनाला केराची टोपली
घंटागाडीतून जनजागृती सुरू; दुकानांसमोर कचऱ्याचे ढीग
म्हसळा, ता. १० (बातमीदार) : तालुका शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नगर पंचायतीकडून दररोज घंटागाडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे आवाहन केले जात असतानाही काही दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. व्यवसायादरम्यान निर्माण होणारा कचरा दुकानासमोर किंवा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.
नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी नियमितपणे शहरातील कचरा गोळा करीत आहेत, मात्र दुकानातील कचरा रस्त्यावर न टाकता कचराकुंडीत अथवा घंटागाडीत देण्याची जबाबदारी दुकानदारांनी स्वीकारणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी घंटागाडीतून स्पीकरद्वारे सूचना व दवंडी दिली जात असली, तरी काही व्यावसायिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘घंटागाडीवर स्वच्छतेचा संदेश आणि दुकानासमोर कचऱ्याचे ढीग’ अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगर पंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांची नसून दुकानदार, व्यावसायिक, कर्मचारी आणि नागरिकांचीही आहे. सफाई कर्मचारी कचरा उचलल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होणार कसे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगर पंचायत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने कायद्याचा धाक कुठे आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात प्रत्यक्ष फेरफटका मारून कचरा टाकणाऱ्या दुकानदारांची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घंटागाडीची दवंडी देण्याबरोबरच कारवाईची कठोर अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य झाले, तरच म्हसळा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.