भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या बसमधून प्रवास करणे महागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून तिकीटदरात वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे देण्यात आला आहे. त्यानुसार भाड्यात किमान दोन ते कमाल १४ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. वातानुकूलित प्रवास मात्र स्वस्त होणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेकडून तीन वर्षांपूर्वी प्रशासकीय कार्यकाळात दरवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता, मात्र त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने आता दरवाढीचा प्रस्ताव महासभेपुढे दिला आहे. बसच्या तिकीटदरात तब्बल १३ वर्षे वाढ करण्यात आलेली नाही, मात्र एवढ्या वर्षात इंधन व सुटे भागाच्या किमतीत तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेच्या ताफ्यात डिझेलवर चालणाऱ्या ७४ व ५७ ई-बस अशा एकंदर १३१ बसचा समावेश असून, त्यात १५ वातानुकूलित बस आहेत. शिवाय पीएम बस योजनेतून आणखी १०० बस लवकरच दाखल होणार आहेत.
या सर्व बस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. महापालिका कंत्राटदाराला प्रती किमी प्रमाणे पैसे देते व तिकिटाद्वारे मिळणारे उत्पन्न महापालिकेला मिळते, मात्र तिकिटाचे दर वाढविण्यात न आल्याने उत्पन्न व खर्च यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा मेळ घालण्यासाठी तिकीटदरात वाढ करणे प्रशासनाला अत्यावश्यक बनले आहे.
दरम्यान, दोन्ही प्रस्ताव १६ ऑक्टोबरला होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहेत. त्यामुळे महासभेत त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.
फेररचना करण्याचे आदेश
दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई व वसई-विरार महापालिकेच्या बस प्रवासी भाड्याशी तुलना केली असता मिरा-भाईंदरचे बस भाडे कमी आहे. त्यामुळे आयुक्तांनी बस भाड्याची फेररचना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वसाधारण बसचे तिकीट भाडे किमान दोन रुपये व कमाल १४ रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव महासभेपुढे देण्यात आला आहे.
वातानुकूलित प्रवास स्वस्त होणार
मिरा-भाईंदर महापालिकेकडून सद्य:स्थितीत १५ वातानुकूलित बस चालविल्या जातात, मात्र त्यांचे प्रवासी भाडे इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार बसभाडे किमान पाच रुपये व कमाल ४५ रुपये कमी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.