पालिका रुग्णालयात
परिचारिकांची जम्बो भरती
भूकंपग्रस्त आणि माजी सैनिकांना संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः खेळाडू, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आदींना मुंबई महापालिकेच्या प्रमुख आणि विशेष रुग्णालयांत परिचारिका म्हणून नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ६५२ परिचारिकांची भरती होणार आहे. त्यासाठी २१ मार्चपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्रमुख आणि विशेष रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय दवाखाने व प्रसूतिगृहांमधील रिक्त परिचारिकांच्या जागी नव्याने भरती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. रिक्त ६५२ जागांसाठी महापालिकेच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर अशा चार प्रमुख रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालय आणि प्रसूतिगृह आदी ठिकाणी परिचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त होती. त्यामुळे रुग्णालयीन कामांमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. पदे भरण्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आणि इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांना ८ ते २१ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान लेखी अर्ज करता येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.