मुंबई

नवी मुंबईत घरभाडे महागले

CD

वाशी, ता. १३ (बातमीदार) : मुंबईला पर्याय म्हणून ७० च्या दशकात नवी मुंबई शहर वसवण्यात आले. सिडकोने निर्माण केलेल्या या शहरात भाड्याने घर घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. घर विकत घेणे परवडत नसल्याने आजमितीस हजारो नागरिक भाड्याच्या घरांत वास्तव्य करत आहेत. परंतु आता घराप्रमाणेच नवी मुंबईतील वाणिज्य व निवासी जागांच्या भाड्यांचे दर अवाच्या सव्‍वा वाढले आहेत.
सिडको महामंडळाने मालमत्ताचे दर निश्चित केले असले, तरी बांधकाम व्यावसायिक मनमानी पद्धतीने प्रति चौरस फूट दर आकारत आहेत. त्यामुळे स्वत:च्या मालकीचे घर घेणे सामान्यांसाठी स्वप्नच ठरत आहे. पर्यायाने भाड्याचे घर घ्यावे लागते. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने काही महिन्यांपासून घरमालकांनी भाडेदरात २५ ते ३० टक्के वाढ केल्यामुळे परवडेल असे घर शोधण्यासाठी सामान्यांना वणवण भटकावे लागत आहे. वाशी, पाम बीच, नेरूळ, ऐरोली व सीवूड्‍स परिसरांत सर्वाधिक महागड्या दराने घर दिले जात आहे. कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, तुर्भे या परिसरांत तुलनेने सामान्यांना परवडेल, असा पर्याय उपलब्ध होत आहे. मात्र तरीदेखील करार संपल्यानंतर नियमाने १० टक्के भाडेवाढीऐवजी नवीन भाडेकरू आणून भाड्यात प्रतिमहा ३ ते ५ हजार रुपये वाढ केली जाते. यामुळे सर्वसामान्यांना भाड्याचे घर शोधताना नटसम्राटमधील आप्पा बेलवलकर यांच्यासारखा कुणी घर देता का घर असा टाहो फोडत खिशाला परवडेल असे घर शोधावे लागत आहे.
विशेष म्हणजे या व्यवहारात मालमत्ता भाड्याने मिळवून देणाऱ्या दलालाचे वर्चस्व अधिक आहे. घर भाड्याने घेणारे भाडेकरू प्रामुख्याने चाकरमानी व कामगार वर्ग आहे. भाडेकरूंना संबंधित सोसायटीलाही काही रक्कम मोजावी लागत असल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागतो. वाशीसारख्या परिसरात वन बीएचकेसाठी १८ ते १९ हजार रुपये प्रति महिना भाडे मोजावे लागत आहे. हीच स्थिती पाम बीच मार्गावरही आहे.

विभागानुसार भाडे
सीवूड्‍समध्ये १६ ते १७ हजार रुपये वन बीएचकेसाठी प्रति महिना भाडे मोजावे लागते. तर वाशीमध्ये २ बीएचकेसाठी २२ हजारांपेक्षा अधिक मासिक भाडे आकारले जाते. सदनिकेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील, तर हेच भाडे आणखी ५ ते ६ हजार रुपयांनी वाढते. कोपरखैरणे परिसरात माथाडींच्या वसाहतीमध्ये ११ ते १२ हजार रुपये मासिक भाडे आकारले जात आहे. पूर्वी हेच भाडे ४ हजार रुपये होते; मात्र माथाडी कामगारांनी मूळ घरावर दोन ते अडीच मजले वाढीव बांधकाम केल्याने या बांधकामापोटी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घरे भाड्याने दिली आहेत. वाशी परिसरामध्ये पूर्वी ७ ते ९ हजारांत वन बीएचके घर भाड्याने सहज उपलब्ध होत होते. ऐरोली परिसरात वन बीएचकेसाठी १५ ते १६ हजार रुपये भाडे आकारले जात आहे.

झोपडपट्टी परिसरातही भाव वधारला
दिघा येथील कारवाईनंतर झोपडपट्टी परिसरातील घरमालकांचा भावही वधारला आहे. नावाला झोपडपट्टी असणारा हा परिसर आता टुमदार घरांनी सजल्याने झोपडपट्टी परिसरात वन रूम किचनसाठी ५ ते ७ हजार रुपये भाडे आकारले जात आहे. पूर्वी गावठाण क्षेत्रात अत्यल्प दरात भाड्याने घरे उपलब्ध व्हायची; मात्र आता मागणी वाढल्याने ग्रामस्थांनी पूर्वीच्या तुलनेत अधिक भाडेवाढ आकारण्यास सुरुवात केली आहे. गावठाण क्षेत्रात ५ ते ६ हजार रुपये मासिक भाडे असलेली घरे सहज मिळायची. आता या ठिकाणी ७ ते ८ हजार रुपये भाडे मोजावे लागतात. चाळ परिसरातही ४ ते ५ हजार रुपये भाडे घेतले जाते.

वाढती महागाई, घेतलेल्या कर्जाचे हप्ते, उदरनिर्वाहाचे साधन, कायद्यातील किचकट प्रक्रिया यामुळे घरमालकांकडून अधिक भाड्यासाठी तगादा लावला जातो. परिणामी, घरभाडे वाढवण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून घर रिकामे केल्यानंतर भाडेवाढ नवीन भाडेकरूसाठी लागू केली जात आहे.
- विनायक पेंडणेकर, इस्टेट एजंट

अकरा महिन्यांचा करार संपल्यानंतर शक्यतो घरमालक पुन्हा करार करण्यास राजी नसतात. करार वाढवला तरी नियमाने १० टक्क्यांऐवजी सरळ अडीच ते ३ हजार रुपयांची भाडेवाढ लागू करतात. घरमालकांची ही भाडेवाढ स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. परवडत नसले तरी डोक्यावर छप्पर असावे म्हणून ही भाडेवाढ मान्य करावीच लागते. भाडे नियंत्रण कायद्याची कोणतीही अंमलबजावणी नवी मुंबई शहरात होत नाही. या कायद्याविषयी भाडेकरूदेखील अनभिज्ञ आहेत.
- सागर कांबळे, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT