मुंबई

गर्जा महाराष्ट्रने दुमदुमले ठाणे

CD

पूर्वसंध्येला रोषणाईने नटलेली शासकीय कार्यालये, उड्डाण पूल, चौक रस्ते... आणि सकाळ होताच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताच्या निनादाने ठाणे दुमदुमले. भगव्या पताका, कुठे ढोल-ताशे, विविध कार्यक्रमांची रेलचेल... पोलिस परेड आणि शासकीय कार्यालयांमधील ध्वजवंदना... एकंदरीत ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
.....

राज्याच्या विकासात ठाण्याचे मोठे योगदान ः जिल्हाधिकारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजवंदाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात पार पडला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना राज्याच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा कार्यालयातर्फे साकेत मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर पहिल्यांदाच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही पोलिस दलाच्या बँड पथकाने वाजविले. यावेळी झालेल्या संचलनात सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव पोलिस दल, होमगार्ड, पोलिस आयुक्तालय, जिल्हा ग्रामीण पोलिस, पोलिस बँड पथक, अग्निशमन दल, ठाणे महापालिका सुरक्षा रक्षक दल, रुग्णवाहिका आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्‍या वैद्यकीय अधिकारी चारुलता धानके यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचा वर्धापनदिन व जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. राज्याच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी ९०० बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तसेच आजपासून जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

१० अधिकाऱ्‍यांना नियुक्ती पत्र
राज्य शासनाच्या विविध रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १० उमेदवारांना यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते नियुक्तीची शिफारस पत्रे देण्यात आली. यामध्ये राज्य कर निरीक्षक व राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील उमेदवारांचा समावेश होता. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचा तंबाखू मुक्तीचा संकल्प
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुमात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण करत संपूर्ण ठाणे जिल्हा तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी महाराष्ट्र दिनी केला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जिल्हा परिषद भवनाच्या आवारात सकाळी सात वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी सलामी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेतली.
.....
दुबईत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा
बदलापूर (बातमीदार) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो. मात्र सातासमुद्रापार दुबईमध्येसुद्धा महाराष्ट्र दिनाचा जागर केला जात आहे. दुबईस्थित मराठी संस्कृती मंडळाने रविवार सुट्टीचा दिवस साधून ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन दुबईत दणक्यात साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सद्‌गुरू फाऊंडेशनचे महेश कुमठेकर, सुशांत चिल्लाळ, माधुरी बोंद्रे-रहाळकर तसेच ज्योती सावंत यांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचा इतिहास याप्रसंगी दुबईत पुन्हा जागा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना यादव, मनोज बागल व मंदार कुलकर्णी यांनी केले. तसेच आभार रेखा सूर्यवंशी यांनी मानले.
......
किन्हवलीत महाराष्ट्राचा जयघोष
किन्हवली (बातमीदार) : किन्हवली, शेणवे, सोगाव, डोळखांब, शेंद्रूण, अस्नोली, नांदवळ आणि परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. तसेच राज्यगीताचा दर्जा मिळालेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
किन्हवली ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर प्रभागात ग्रामपंचायत सदस्या अपर्णा पतंगराव यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेचे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी रणजीत महिपतराव, संजय महिपतराव, पोलिस पाटील राहुल पतंगराव आदी उपस्थित होते.
....
गणेश घाट डेपोतही कार्यक्रम
कल्याण (बातमीदार) : महाराष्ट्र दिनानिमित्त केडीएमटीच्या गणेश घाट डेपोमध्ये केडीएमटी व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उप व्यवस्थापक संदीप भोसले, परिवहन समिती सदस्य संजय मोरे, बंडू पाटील, रमेश पिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, तसेच कार्यशाळा कामगारांचा सत्कार करण्यात आला.
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT