मुंबई

फुफ्फुसाच्या आजाराचा धोका

CD

फुप्फुसाच्या आजाराचा धोका
सीओपीडीमुळे दिवसाला सहा मुंबईकरांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : अयोग्य जीवनशैली आणि वाढत्या हवाप्रदूषणामुळे दिवसाला सहा मुंबईकरांचा मृत्यू होत असल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुंबईत सध्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) ही एक मोठी समस्या आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे सहा लोक या तीव्र दाहक फुप्फुसाच्या आजारामुळे जीव गमावत आहेत.
२०१६ ते २०२१ या कालावधीत, मुंबईतील एकूण १४ हजार ३९४ रुग्णांचा सीओपीडीमुळे मृत्यू झाला आहे. सीओपीडी हा एक फुप्फुसाचा आजार आहे. ज्यामध्ये अधूनमधून तीव्रता वाढते, ज्याला फुफ्फुसाचा झटका असेही म्हणतात. हा झटका अनेकदा प्राणघातक ठरू शकतो. हानिकारक प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे हा आजार होतो. ज्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या नळ्या आणि फुप्फुसाच्या काही भागाला नुकसान पोहोचते. कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन, स्वयंपाकासाठी बायोमास इंधन जाळल्याने होणारे घरगुती वायुप्रदूषण, मच्छर कॉईल जाळणे, मोटार वाहनांच्या बाहेर पडणाऱ्या वातावरणातील वायू उद्योगाचा धूर, रस्त्यावरील धूळ आणि धुळीच्या ठिकाणी काम करणे हे धोकादायक असू शकते. बालपणात वारंवार होणारे श्वसनमार्गाचे संक्रमण, वेळीच उपचार न मिळाल्यास तसेच दम्याचा विकार ही सीओपीडीची इतर कारणे आहेत. सीओपीडीमुळे दरवर्षी सरासरी २,३९९ मृत्यू होत असल्‍याचे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

दम्याचेही प्रमाण अधिक
सीओपीडीनंतर तीव्र श्वसन आजार जसे की दमा, ब्राँकायटिस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार ही धोकादायक ठरत आहेत. सलग सहा वर्षांत दम्यामुळे ७,०६९ रुग्णांनी जीव गमावला आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू
वॉर्डनिहाय आकडेवारीचे विश्लेषण केल्यास झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे दिसून येते. एम-पूर्व वॉर्ड ज्यामध्ये गोवंडीचा समावेश होतो तिथे मानवी निर्देशांक विकास सर्वात कमी असून सीओपीडीमुळे ६७५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे अंधेरी (पूर्व) म्हणजेच के पूर्वमध्ये ९७१ मृत्यू झाले आहेत.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको
छाती विशेषज्ञ आणि ब्रॉन्कोस्कोपिस्ट, डॉ. त्रिदीप चॅटर्जी यांनी सांगितले की, सीओपीडीचे लक्षण म्हणजे सातत्याने श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुप्फुसाला हवेचा कमी पुरवठा होणे. सीओपीडीचा वाढता प्रकार पाहता अधिकतर रुग्ण हे सुरुवातीला हा त्रास दुर्लक्षित करतात आणि नंतर त्रास वाढल्यावर उपाय करतात. साधारणपणे दवाखान्यातील रुग्ण, त्‍यांच्या आरोग्‍याचा इतिहास आणि तपासणी करून मग सीओपीडीचे निदान केले जाते. या वेळी कित्येकदा आजाराचा पहिला टप्पा हा दुर्लक्षित होतो. स्पायरोमीटर टेस्टसारख्या टेस्ट केल्यास पहिल्या टप्प्यातच रोगाचे निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होते.

वायुप्रदूषणाचा धोका
पल्मोनोलॉजिस्ट डॉ. चेतन जैन म्हणाले, मुंबईत वाढत्या लोकसंख्येसह सतत नव्याने सुरू असलेली बांधकामे, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक प्रदूषण आणि जीवाश्म इंधन तसेच कचरा जाळणे आणि जंगलतोड यामुळे होणारे वायुप्रदूषण वाढले आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. वायुप्रदूषणामुळे फुप्फुसाचे कार्य बिघडते. यामुळे ॲलर्जीक ब्राँकायटिस, दमा, सीओपीडी यांसारख्या आजारांबरोबरच श्वासोच्छ्वासाची समस्यादेखील उद्भवते. तसेच यामुळे विविध आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढते. लहान मुलांनामध्ये प्रदूषणामुळे फुप्फुसांची वाढ खुंटते आणि भविष्यात श्वसनासंबंधी आजार होण्याचे प्रमाण वाढते.

सीओपीडी हा एक टाळता येणारा आजार आहे; पण त्यावर कोणताही इलाज नाही. इतर आरोग्य स्थितीमुळे ग्रस्त व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती बिघडते. धूम्रपानाची सवय आणि प्रदूषण हे सीओपीडीसाठी मुख्य जोखीम घटक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये धूम्रपानाच्या वाढत्या सवयींमुळे महिलांमध्ये सीओपीडी प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे.
- डॉ. जलील पारकर, वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट

सीओपीडीमुळे मृत्यू होण्यासाठी अनेकदा घरातील प्रदूषणही कारणीभूत ठरते. झोपडपट्टीतील बहुतांश रहिवासी अजूनही स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाचा वापर करतात. लाकडाच्या धुराचा दीर्घकाळ घरातील संपर्क बाहेरील वायुप्रदूषणापेक्षा पाचपट जास्त धोकादायक आहे. काही भागांत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सीओपीडी प्रकरणांची संख्या जास्त असल्याचे आढळते.
- शेख फैयाज आलम, अध्यक्ष, न्यू संगम वेल्फेअर सोसायटी

सीओपीडीमुळे मृत्यू
वर्ष मृत्यू
२०१६ २,४४२
२०१७ २,४९०
२०१८ २,७४५
२०१९ २,५१३
२०२० २१२०
२०२१ २०८८

दम्‍यामुळे झालेले मृत्‍यू
वर्षे मृत्यू
२०१६ ११२८
२०१७ ११६०
२०१८ १२०५
२०१९ ११५७
२०२० १२९५
२०२१ ११२४

सर्वाधिक मृत्यू नोंदवलेले वॉर्ड
ई वॉर्ड - ९८१
एफ उत्तर- ९९४
एफ दक्षिण - ९६२
के पश्चिम - ९०२
आर दक्षिण -७७९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT