मुंबई

वसईत पाण्याचे दुर्भिक्ष्य

CD

वसई, ता. २४ (बातमीदार) : मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढत आहे, तशी जलपातळी खालावत आहे. वसई पूर्व परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे, तर कूपनलिकेतूनही पाणी येत आहे. या परिसरात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. परिणामी टँकर आणि कामण नदी पात्रात खड्डे खोदून पाणी गोळा करण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी उन्हाचे चटके सहन करत असणारी ही वणवण कधी थांबणार, अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वसई पूर्वेतील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई पाडा, कोल्ही, बेलकडी ते सातिवली गाव आणि पाड्यांची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. महापालिकेत या गावांचा समावेश झाल्यावर येथील जिल्हा परिषदेची लघू पाटबंधारे योजना आणि दलित वस्ती योजना बंद झाली आहे; परंतु प्रशासनाने या ठिकाणी पाण्यासाठी पुरेसे लक्ष दिले नाही. दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी हे विहिरीतून मिळते; मात्र वाढत्या कडाक्यामुळे आता विहिरीदेखील कोरड्या पडल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या पूर्व परिसरात पाणीबाणी सुरू झाली आहे. त्याची सर्वाधिक झळ महिलांना बसत असून त्यांना पायपीट करावी लागते.

वसई विरार महापालिकेकडून या परिसरात दररोज सात टँकरने पाणीपुरवठा केला जातो; परंतु लोकसंख्येच्या मानाने हे पाणी कमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच कधी कधी टँकर गावात पोहचत नाही. अनेकदा नागरिकांनाच पदरमोड करून टँकरची मागणी करावी लागते. एकाच ठिकाणी टँकर उभा करून टाकीत पाणी जमा करून ते वितरित करण्यात येते. त्यामुळे गावातील नागरिकांना पायपीट करत हांडे, कळशा भरण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

कामण नदीपात्रात खड्डे
वसई पूर्वेला कामण नदी आहे. डोंगरावरचे पाणी वाहत कामण नदीत येते; परंतु या नदीतील पाण्याचे स्रोत हरवत चालले आहे. कामणमधील आजूबाजूच्या १० ते १५ गावांतून वाहणाऱ्या नदीचा बापाणे येथे शेवट होतो. सध्या या नदीचे पात्र कोरडे आहे; परंतु पाण्यासाठी खड्डे खोदण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे. या खड्ड्यांत पाणी साचल्यावर ते भांडी, कपडे धुण्यासाठी वापरले जाते.

महागड्या जारचा पर्याय
अनेक ठिकाणी नळाला पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे जार (प्लास्टिक बाटल्या) खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकांना परवडत नाही. मात्र पाणी अत्यावश्‍यक असल्याने नागरिकांनी महागड्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
कामण नदीपात्रात पाण्याचा शोध घेण्यासाठी खड्डे खणले जात आहेत. त्यातून मिळणारे पाणी हे अशुद्ध असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने येथील गावांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

वसई पूर्वेत पाण्याची समस्या भयावह आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलभर प्रवास करावा लागत आहे. विहिरींमध्ये गाळ साचला असून अनेक ठिकाणी त्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने टँकर, तसेच नदीपात्रात खड्डे खणून पाणी घेतले जाते, हे दुर्दैव आहे. वसई विरार महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- दिनेश म्हात्रे, माजी सरपंच, कामण ग्रामपंचायत

पाण्याची समस्या असताना प्रशासनाचे लक्ष नाही. दूरवरून पाणी आणावे लागते. घरातील स्वयंपाक व अन्य कामे करताना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने दमछाक होते. मुबलक पाणी मिळाले तर महिलांना त्रास सहन करावा लागणार नाही.
- कल्पना शेलार, महिला

उन्हाळ्यात नेहमीच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. महापालिकेने कामण व आजूबाजूच्या गावांसाठी पाणीयोजना कार्यान्वित करावी जेणेकरून पाणी मिळेल आणि नागरिकांचे हाल होणार नाहीत.
- प्रकाश म्हात्रे, नागरिक

महापालिकेकडून टँकर पुरवठा
कामण ३
देवदळ, सागपाडा २
चिंचोटी ३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT