सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील हॉटेलवर हातोडा पडणार, असा गौप्यस्फोट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे; मात्र वायकर यांनी याचे खंडन केले आहे. ‘मी कधीही बेकायदा काम केले नाही. हॉटेल पाडल्याचे फोटो आहेत. ते जुने आहेत. जुन्या कायद्याप्रमाणे ‘सुप्रिमो’ मी पाडले, नवीन कायद्यानुसार सर्व परवानग्या घेतल्या आहेत,’ असे स्पष्टीकरण देत राजकीय दबावापोटी हे सर्व चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
‘२०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने आमदार वायकर यांना जोगेश्वरी येथील व्यारवली गावात सर्व्हे क्र. १-बी, १-सी यावर २ लाख चौरस फूट फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली. ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे. वायकर यांनी ९ फेब्रुवारी २००४ रोजी मुंबई महापालिकेचे नियम, डीसीपीआर १९९१ च्या अंतर्गत या खेळाच्या मैदानाचा काही भाग स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासमोरील उर्वरित मैदान हे कायमचे मैदान म्हणून आरक्षित राहणार आणि मनोरंजन मैदान म्हणूनच त्याचा वापर भविष्यात केला जाणार, अशा प्रकारचे वचन दिले होते. २०२१ मध्ये वायकर यांनी ही गोष्ट लपविली. मुंबई महापालिकेची फसवणूक केली,’ असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
‘ही गोष्ट महापालिका अधिकाऱ्यांना माहिती होती, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहिती होती. हॉटेलसाठी ही जागा वापरण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली,’ असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महापालिकेने आता १५ जून २०२३ रोजी वायकर यांना या हॉटेलची परवानगी रद्द करण्यात येत आहे, असा आदेश दिला आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
...
स्पष्टीकरण मागविले होते!
‘मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या संबंधांत वायकर यांना नोटीस दिली, स्पष्टीकरण मागविले. काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेला यासंबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले,’ असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ‘मला साडेतीन वाजता, तर माझ्या आर्किटेक्टला साडेअकरा वाजता नोटीस मिळाली; मात्र राजकीय सूडबुद्धीने हे सर्व चालले आहे. मी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. नवीन कायद्यानुसार मी बांधकाम केले आहे. त्याच धर्तीवर अन्य लोकांनाही परवाग्या दिल्या आहेत. मग त्यांचे काय,’ असा सवाल वायकर यांनी केला आहे.
...
न्यायालयात जाणार!
‘नोटिसा तत्परतेने दिल्या आहेत. हे सर्व राजकीय दबावापोटी चालले आहे. उद्या (ता. १७) मी न्यायालयात जाणार आहे,’ असे आमदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.