सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१: मुंबई उच्च न्यायालयाने भीमा-कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी महेश राऊत यांना अटींसह जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने आज महेश राऊत यांना जामीन मंजूर केला. माओवाद्यांशी संबंधांच्या आरोपातून त्यांना ६ जून २०१८ रोजी ‘एनआयए’ने अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात इतर आरोपी सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा जामिनावर बाहेर आहेत. वरवरा राव वैद्यकीय जामिनावर असून गौतम नवलखा नजरकैदेत आहेत.
महेश राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. राऊत कथित नक्षलवादी संघटनेचा सदस्य नसून, तो पदवीधर असल्याचे देसाई यांनी न्यायालयात सांगितले. तसेच ते गडचिरोलीतील आदिवासींसाठी सरकारसोबत काम करत असल्याचा दावाही वकिलांनी केला. एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास आणि वकील संदेश पाटील यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपीने देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे ‘मोठे षडयंत्र’ रचल्याचा आरोप करत त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारल्याचा दावा केला. तसेच काही प्रतिबंधित माओवादी संघटनांनी राऊत आणि इतर सहआरोपी सुरेंद्र गडलिंग आणि सुधीर ढवळे यांना पाच लाख रुपये दिल्याचा आरोप केला.
राऊत गडचिरोलीतील माओवाद्यांच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचे पुरेसे पुरावे असल्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले. याबरोबरच कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवून आणणारी परिस्थिती निर्माण केली. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यावर खंडपीठाने या व्यक्तीचा मृत्यू दंगलीत झाला असून, त्याला मारण्याचा आरोपीचा हेतू स्पष्ट होत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राऊत यांचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला.
कोण आहे महेश राऊत?
महेश राऊत यांची गडचिरोलीतील आदिवासींसोबत काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. त्यांची २०१३ मध्ये प्रतिष्ठित पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झाली होती आणि त्यांना गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी निवडण्यात आले होते. या फेलोशिप दरम्यान त्यांनी पंचायती राज विस्तारित अनुसूचित क्षेत्रे आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीचे काम हाती घेतले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक आणि सरकार यांच्यात संपर्क साधण्यात यश मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.