निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत आयुक्तांना निवेदन
वसतिगृह ते मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. डॉक्टरांची दिवाळी ही गोड व्हावी यासाठी मार्ड संघटनेने सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारने डॉक्टरांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या आयुक्तांना यासंबंधित निवेदन देण्यात आले आहे. मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात निवासी वसतिगृह, स्टायपेंड वाढवणे आणि स्टायपेंडमध्ये नियमितता; तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवासी डॉक्टरांची मानसिक स्थिती या काही गंभीर मुद्यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
सद्यस्थितीत पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या सीट्स वाढल्या आहेत. त्या तुलनेत राहण्याची सोय कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांना गर्दी करून राहावे लागत आहे. अशा वेळेस राहण्याची योग्य सोय उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निवासी वसतिगृहाचे काम लवकर करून विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच निवासी डॉक्टर्स मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. १८ तास काम करूनही त्या बदल्यात मिळणारा मोबदला हा कमी आहे. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांना इतर राज्यांच्या तुलनेत कमी स्टायपेंड दिला जातो. त्यामुळे निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या स्टायपेंडची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे; तर उशिरा मिळणाऱ्या स्टायपेंडमुळे निवासी डॉक्टरांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.
......................................
समस्या निवारण समिती
वाढलेल्या कामाच्या ताणामुळे निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. निवासी डॉक्टरांमध्ये नैराश्य आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयीन आणि राज्यस्तरीय समस्या निवारण समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ही समिती निवासी डॉक्टरांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, शोधण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतील. तसेच मार्गदर्शन आणि त्यांना येणाऱ्या कोणत्याही आव्हानांसाठी मदत मिळवता येईल.
...................................
एनएमसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार कामाच्या तासांचे नियमितीकरण
कमाल ४८ तासांचे काम दर आठवड्याला, किमान एक साप्ताहिक सुट्टी, प्रति शिफ्ट कमाल १२ तास काम. सीट सोडल्यानंतर दंडातून सुटका.
.........................................
आम्हाला विश्वास आहे, की या मागण्यांचे निराकरण केल्याने अधिक अनुकूल वातावरण निर्माण होईल. निवासी डॉक्टरांमुळे रुग्णांची योग्यरीत्या काळजी घेता येईल. या समस्यांवर एकत्रितपणे चर्चा करून उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
डॉ. अभिजीत हेलगे, केंद्रीय मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.