प्रिमिअर १
सकाळ विशेष लेख
पठाण, जवान, डंकी
शाहरूख खान यशाच्या हॅट्ट्रिककडे...
दिलीप ठाकूर
‘आराधना’च्या (१९६९) सुपर हिट यशासह राजेश खन्नाचे ओळीने पंधरा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले हा ‘फ्लॅशबॅक’ (अथवा इतिहास) कायमच कौतुकाचा. अमिताभ बच्चनचे १९७८ मध्ये ‘कस्मे वादे’, ‘त्रिशूल’ व ‘डॉन’ मुंबईत लागोपाठ रिलीज होत सुपरहिट झाल्याने अमिताभ बच्चन नावाचे असे काही लोकप्रिय वातावरण तयार झाले, की त्यात ‘बेशरम’ हा रखडत रखडत तयार झालेला चित्रपटही हिट ठरला. यश म्हणतात ते हेच असते. थिएटर हाऊसफुल्ल हवीत. १९७७ या एकाच वर्षात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे ‘चाचा भतीजा’, ‘धरमवीर’, ‘अमर अकबर ॲन्थनी’ व ‘परवरीश’ हे चारही चित्रपट ज्युबिली हिट ठरले. हे मसालेदार मनोरंजक चित्रपट जनसामान्यांपर्यंत खोलवर पोहचले. ...आणि आता २०२३ मध्ये शाहरूख खानही यशाची हॅट्ट्रिक साध्य करण्याच्या स्थितीत अथवा पोझमध्ये दिसतोय. तसंच वातावरण दिसतंय. काळ मात्र बदललाय. खूपच पुढे गेलाय. या वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे २५ जानेवारी रोजी यशराज फिल्म निर्मित व सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ पडद्यावर आला तोच फर्स्ट शोपासूनच सुपरहिट. या खणखणीत यशाने ‘बॉयकॉट’ बॉलीवूड’ ट्रेण्डला पुरतं निकालात काढलं. मागे टाकलंय. प्रत्येक यश काही तरी देतच असते. या यशाने शाहरूख खान वयाच्या अठ्ठावन्नाव्या (५८) वर्षीदेखील लोकप्रिय आहे ‘नायक’ म्हणून त्याला स्वीकारले जातेय हे अधोरेखित झाले आणि त्याच वातावरणात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा आघाडीचा दिग्दर्शक अटली याचा ‘जवान’ दणक्यात प्रदर्शित झाला आणि शाहरूखच्या पिता व मुलगा या दुहेरी भूमिकेत रसिकांना आवडला. या वर्षातील शाहरूखचा हा दुसरा सुपरहिट पिक्चर आणि आता त्याची भूमिका असलेला राजकुमार हीरानी दिग्दर्शित आणि खुद्द शाहरूखच्या रेड चिली एण्टरटेन्मेन्ट निर्मित ‘डंकी’ २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘पठाण’ व ‘जवान’ हे चित्रपट गुणवत्तादृष्ट्या कदाचित फार ग्रेट असतील वा नसतीलही, पण रसिकांचे भरपेट मनोरंजन केले हे जास्त महत्त्वाचे.
खरं तर राजकुमार हीरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’(२००३) ही व्यक्तिरेखा शाहरूख खानच साकारणार होता. अलीकडेच निर्माता विधु विनोद चोप्राने एका रिॲलिटी शोमध्ये तसं म्हटलंही, पण शूटिंग सुरू व्हायच्या वेळेस शाहरूखला उपचारासाठी इंग्लंडला जावे लागल्याने त्याच्याऐवजी संजय दत्त आला. मला वाटतं, शाहरूखनेही ‘मुन्नाभाई’ आपल्या अतिशय मोकळ्या शैलीत खुलवला असता. तेव्हा राजकुमार हीरानीच्या दिग्दर्शनात अभिनय करण्याची शाहरूखची राहिलेली संधी ‘डंकी’त मिळालीय. एव्हाना राजकुमार हीरानीच्या प्रगती पुस्तकात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (२००३), ‘लगे रहो मुन्नाभाई’ (०६), ‘थ्री इडियट्स’ (०९), ‘पीके’(१४) आणि ‘संजू’(१८) असे विविध थीमवरील यशस्वी चित्रपट आहेत. आपल्या दोन चित्रपटांच्या दरम्यान त्याने ठेवलेले अंतर त्याच्या प्रगल्भतेचा प्रत्यय देतेय. दृश्य माध्यमाची अतिशय उत्तम जाण असलेला दिग्दर्शक म्हणून राजकुमार हीरानी ओळखला जातो. त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाल्याने ‘डंकी’कडून खूप अपेक्षा आहेत. शाहरूख तसा खूपच विचारपूर्वक चित्रपट स्वीकारणारा कलाकार आहे. म्हणूनच तर तो तीसपेक्षा जास्त वर्षे आपला ‘स्टारडम’ व लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या वाटचालीत, प्रगतीत अनेक अडथळे, आव्हाने आली. त्यावर संयमाने मात करत करत त्याने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. अमली पदार्थासंदर्भात त्याच्या मुलावर झालेले आरोप, त्याला झालेली शिक्षा यात शाहरूखची पिता म्हणून मोठीच कसोटी होती आणि स्टार म्हणून कसब होते. या प्रकरणात त्याला मुलाचे आणि एकूणच कुटुंबाचे भावविश्व जपायचे होते आणि या वादळात त्याची लोकप्रियता घसरण्याची भीती होती, पण शाहरूखने या सगळ्यावरचे भाष्य टाळून उगाच अधिक गैरसमज निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष दिले आणि आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुलाखती टाळून ‘मुलाचा विषय उगाळू दिला नाही.’
या सगळ्या घडामोडीत ‘बॉयकॉट बॉलीवूड’चं संकट होतंच, ‘पठाण’मधील दीपिका पदुकोणच्या बिकीनीचा रंगही वादाचा ठरला. यावर यश हाच एक उत्तम उपाय व उत्तर होते आणि या सगळ्या गोंधळात कळतनकळत शाहरूख टार्गेट होता. ही फार अवघड स्थिती असते. सोशल मीडियाच्या वेगात तर चित्रपट प्रदर्शित होत असतानाच नकारात्मक प्रतिक्रिया व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते.
‘पठाण’ प्रदर्शित झाला आणि वातावरणात सकारात्मकता आली. शाहरूखच्या चाहत्यांनी चित्रपट उचलून घेतला. मग ‘जवान’ आला. तोही लोकप्रिय. या यशोगाथेतच त्याचा वाढदिवस आला आणि मन्नत बंगल्याबाहेर आदल्या रात्रीपासूनच त्याचे निस्सीम भक्त जमा होऊ लागले. त्यांच्यासाठी भाईचा वाढदिवस म्हणजे जणू घरचा सणच. मोठाच इव्हेन्ट. अतिशय जल्लोषात तो साजरा झाला. कलाकाराच्या लोकप्रियतेत वय हा फक्त एक आकडा असतो, असे यातून अधोरेखित होते. याच सकारात्मक वातावरणात आता ‘डंकी’ला टीझरपासूनच सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळू लागले, हेच चिन्ह सांगतेय ‘डंकी’चे जोरदार स्वागत होणार आणि मग राजकुमार हीरानींच्या दिग्दर्शन प्रभावातून रसिक सुखावणार... तात्पर्य, शाहरूख खान २०२३ मध्ये यशाची हॅट्ट्रिक साधाणार असेच ‘चिन्ह.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.