मुंबई

सूर तेच छेडिता गीत उमटले नवे

CD

आयुष्यात कधी कधी अनाकलनीय वळणे येतात आणि जीवनाची नौका वेगळ्याच दिशेने जाऊ लागते. संगीतकार एन. दत्ता तथा दत्ता नाईक यांना हाच अनुभव आला होता. खरेतर पन्नासच्या दशकातील हिंदी सिनेमाच्या आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जात होते. मरीन ड्राईव्ह, मिलाप, धूल का फूल, साधना, धर्मपुत्र अशा अनेक हिंदी चित्रपटांना संगीत देत ते प्रमुख हिंदी चित्रपट संगीतकारांच्या रांगेत बसले होते. गीतकार साहीर लुधियानवी यांच्या सोबत त्यांची खास जोडी जमली होती. सर्व काही व्यवस्थित चालू होते; पण वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या संगीतमय कारकीर्दीला जणू खीळ बसली. तेव्हा बी. आर. चोप्रा यांच्या ‘गुमराह’ला ते संगीत देत होते. काळ कुणासाठी थांबत नाही. चोप्राही एन. दत्ता यांच्यासाठी थांबले नाहीत. संगीतकार रवि यांना घेऊन त्यांनी आपला चित्रपट पूर्ण केला. आजारपणामुळे एन. दत्ता वर्षभर अंथरुणावर होते. नंतर पुन्हा नव्याने उभे राहून आपली संगीतमय कारकीर्द सुरू करावी लागली. मात्र तेव्‍हा हिंदी सिनेमाची गणिते बदलली होती.
एन. दत्ता खचले नाहीत. ते पुन्हा जोमाने उभे राहिले. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. त्यांनी हिंदीसोबतच आपला मोर्चा मराठी सिनेमाकडे वळविला. अशोक ताटे (अभिनेत्री भावनाचे पती) यांनी १९६४ साली ‘एक दोन तीन’ हा चित्रपट बनविला होता. यातील शांता शेळके यांनी लिहिलेल्या गीतांना एन. दत्ता यांनी संगीत दिले होते. १९६५ साली आलेल्या ‘मधुचंद्र’ या चित्रपटातील गाणी आजही रसिक आवडीने ऐकतात. काशिनाथ घाणेकर आणि उमा ही जोडी असलेल्या चित्रपटातील गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा’, ‘सुरावटीवर तुझ्या उमटती’, ‘मधु इथे अन्‌ चंद्र तिथे झुरतो अंधारात’, ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षांपरी’ या गाण्यांनी इतिहास घडविला. तत्कालीन मराठी चित्रपट संगीताशी तुलना करता एन. दत्ता यांची ही गाणी आणि संगीत पूर्णत: वेगळे होते. कुठेतरी तरुणाईला को-रीलेट करणारे होते. मराठी चित्र संगीतातील हे मन्वंतर होते. राजदत्त यांनीच दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ (रमेश देव, सीमा देव, इंद्राणी मुखर्जी) या चित्रपटाला संगीत देताना त्यांनी मराठी चित्रपट संगीतात पहिल्यांदाच पियानो या वाद्याचा वापर केला. ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’, ‘स्वप्नांत पाहिले जे ते रूप हेच होते’, ‘असेच जुळले गीत सुरात अशीच जुळते साथ’, ‘सूर तेच छेडिता गीत उमटले नवे’, ‘तुझी प्रीत आज कशी स्मरू’ या गाण्यांनी मराठी संगीताची श्रीमंती वाढली. १९६९ सालच्या मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘अपराध’ला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला.
यानंतर असेल माझा हरी, अजब तुझे सरकार, तिथे नांदते लक्ष्मी हे त्यांचे तीन चित्रपट १९७१ साली पडद्यावर आले. चांगली स्टार कास्ट, चांगले संगीत असूनही ते चालले नाहीत. १९७५ साली महेश कोठारे आणि राधा बारटक्केला घेऊन प्रभाकर पेंढारकर यांनी ‘प्रीत तुझी माझी’ हा युथ फुल सिनेमा बनविला होता. यातील गंगाधर महाम्बरे यांनी लिहिलेले आणि रवींद्र साठे आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. एन. दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली यातली इतर गाणी ही छान होती. शांतता खून झाला आहे (१९७५), बदला (१९७७) हे त्यांचे दोन चित्रपट झाल्यानंतर त्यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला. विक्रम गोखले, आशा काळे ही जोडी असलेला हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. एन. दत्ता यांच्या मराठी चित्रपटातील मेरुमणी शोभावा असे याचे संगीत होते. धुंदीत गाऊ मस्तीत राहू (आशा भोसले, महेंद्र कपूर), माझ्या मनी प्रियाची (आशा), अरे मन मोहना (आशा), हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा (उषा), निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, बाळा गाऊ कशी अंगाई (सुमन) ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. एन. दत्ता यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. यात तीन गायिकांच्या स्वराचा वापर एन. दत्ता यांनी केलेला दिसतो.आशा, उषा आणि सुमन कल्याणपूर! यातल्या ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ या गीताने पुरस्कार मिळविला आणि अफाट लोकप्रियतादेखील मिळवली. या गीतात तार शहनाई हे मराठीत अभावानेच वापरले जाणारे वाद्य आहे. या गीतात सतार, कोंगो आणि व्हायोलीन या वाद्यांचा फार सुंदर वापर केला आहे. १९७९ साली त्यांनी स्वरबद्ध केलेला ‘मामा भाचे’ या चित्रपटातील ‘निळे गगन निळी धरा’ हे जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले गीत गाजले. ३० डिसेंबर १९८७ या दिवशी वयाच्या साठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.एकाच महिन्यात जन्मदिन आणि मृत्यू दिन असा दुर्दैवी योग त्यांच्याबाबत झाला. आज १२ डिसेंबर एन. दत्ता यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या मराठी कारकीर्दीची ही ओळख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

करपलेलं सोयाबीन... चाऱ्यासाठी काढणी! शेतात महिलांची धडपड!

SCROLL FOR NEXT