सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वागणे, नियमांचे उल्लंघन, जवळचे किंवा रात्रीचे भाडे नाकारणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. प्रवाशांना या त्रासाला रोजच सामोरे जावे लागते. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून (आरटीओ) प्रवाशांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप आणि ईमेल आयडी दिला आहे. चालू आर्थिक वर्षात दोन हजारांहून अधिक तक्रारी प्रवाशांकडून आल्या आहेत. त्यानंतर झालेल्या कारवाईत ६५४ वाहन परवाने निलंबित करण्यात आले असून साडेसोळा लाख दंड वसुली करण्यात आली आहे.
अनेकदा रिक्षा, टॅक्सीचालकांनी भाडे नाकारल्यास प्रवाशांचे त्यांच्यासोबत खटके उडतात. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जायचे असेल तर मोठी गैरसोय होते. रिक्षा-टॅक्सीचालक अनेकदा लांबपल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. याबद्दलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर कारवाई केली जाते. तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढे येत नव्हते. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी वाढली होती. मुंबईतील आरटीओ कार्यालयांनी ईमेल आयडी आणि व्हॉट्सॲप क्रमांक दिल्याने प्रवासी तक्रारीसाठी पुढे येत आहेत.
दैनंदिन प्रवास करताना नागरिकांना ऑटो रिक्षा/टॅक्सीचालक यांच्याकडून प्रवाशांकडून गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, निश्चित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत कारवाई करण्यात येते. आरटीओने प्रवाशांच्या मदतीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ईमेल आयडी सुरू केला आहे. त्यावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
-------
विभागनिहाय कारवाई
ताडदेव - अंधेरी - वडाळा - बोरिवली
तक्रारी - १,०१३ - १७८ - ७१७ - २४
नोटीस - ५८४ - १७८ - ७१७ - २४
चालक परवाना निलंबन - ० - ६५ - ० - ४
वाहन परवाना निलंबन - ० - ० - ६५४ - ०
दंड (रुपयांत) - ११,००,०००- २,०८,००० - २,०४,००० - १,२८,०००
---------
ताडदेवमध्ये सर्वाधिक तक्रारी
मुंबईत सर्वाधिक प्रवाशांच्या तक्रारी या ताडदेव आरटीओत आल्या आहेत. दोन हजार तक्रारींपैकी एक हजार तक्रारी ताडदेव आरटीओत आहेत, तर साडेसोळा लाख दंड वसुलीपैकी सर्वाधिक ११ लाख दंडवसुली ताडदेव आरटीओत जमा झाली आहे.
--
नावापुरती कारवाई
शेअर रिक्षात अतिरिक्त प्रवासी बसवले जातात. ते माहिती असूनही वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. तसेच आरटीओ विभाग नावापुरती कारवाई करत आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, मालाड, कांदिवली, सांताक्रूझ, कुर्ला मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आदी ठिकाणी रिक्षात पाच प्रवासी बसवले जातात. यामुळे चांगल्या रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे.
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी सेल
…..
काय होते कारवाई?
रिक्षा टॅक्सी तपासणी करून जादा भाडे, जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन केल्याप्रकरणी परवाना निलंबन, अनुज्ञप्ती निलंबन यासह दंड आकारला जातो.
---
येथे आकारले जाते जादा भाडे
सीएसएमटी, दादर स्थानक परिसरात टॅक्सीचालक हे जवळचे भाडे नाकारतात. सीएसएमटी ते गोल देऊळ मंदिर येथे जाण्यासाठी २०० ते २५० रुपयांची मागणी केली जात आहे. तसेच दादर रेल्वे स्थानकाबाहेर सातत्याने भाडे नाकारले जात आहे. मीटरचे भाडे नाकारून मनमानी भाडे मागितले जाते. एक किमीच्या अंतरासाठी ७० रुपयांची मागणी केली जाते. कुर्ला, वांद्रे आणि अंधेरीमध्ये रिक्षाचालकांच्या प्रवाशांना सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत.
-----
कुर्ला स्थानक पूर्व ते वाशीनाका येथे ८० रुपये मीटर होते; पण रिक्षाचालक १५० ते २०० रुपयांची मागणी करतात. तसेच ते मीटरने जाण्यास नकार देतात.
- सुजित वाघमारे, प्रवासी
----
अंधेरी स्थानक ते अंधेरी एमआयडीसी येथे ५० रुपये मीटर होते; पण स्थानकाबाहेर रिक्षाचालक २०० रुपयांची मागणी करतात. तसेच इतर मीटर रिक्षाचालकांना तिथे थांबू दिले जात नाही.
- अभिषेक भुरे, प्रवासी
--
वांद्रे स्टेशन ते बीकेसी येथे जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून ३० ते ६० रुपये अतिरिक्त वसूल केले जातात. कमी अंतरावरच्या १५ रुपये भाड्याऐवजी ३० ते ४५ रुपये घेतले जातात.
- गणेश म्हस्के, प्रवासी
----
परिवहन विभागाच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी या रिक्षा- टॅक्सीचालकांच्या भाडे नाकारण्याबाबत आहेत. रिक्षा- टॅक्सीचालकांनी भाडे नाकारू नये. भाडे नाकारल्याचे आढळल्यास संबंधित चालकाचा परवाना निलंबित करण्यात येईल.
- विनय अहिरे, प्रवक्ता, परिवहन विभाग
…..
येथे करा तक्रार
ताडदेव - ९०७६२०१०१०
अंधेरी - ९९२०२४०२०२
वडाळा - ९१५२२४०३०३
बोरिवली - ८५९१९४४७४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.